चला उतरा शेगाव आले… पण तो ढिम्‍मच!; हलवून पाहिले, तोंडावर पाणी मारले… नंतर कळले अरेच्‍चा प्रवासातच दगावला!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी बस शेगावला पोहोचली. सर्व प्रवासी उतरले. पण एक प्रवासी सीटवरच झोपलेला… कंडक्टरने आवाज दिला. पण प्रतिसाद शून्य… त्यांनी या प्रवाशाच्या तोंडावर पाणी मारले, हलवून पाहिले… पण ढिम्मच… तो प्रवासी चक्क प्रवासातच मरण पावला होता… या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना आज, …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एसटी बस शेगावला पोहोचली. सर्व प्रवासी उतरले. पण एक प्रवासी सीटवरच झोपलेला… कंडक्‍टरने आवाज दिला. पण प्रतिसाद शून्य… त्‍यांनी या प्रवाशाच्‍या तोंडावर पाणी मारले, हलवून पाहिले… पण ढिम्मच… तो प्रवासी चक्‍क प्रवासातच मरण पावला होता… या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. ही घटना आज, 7 जुलैला सकाळी साडेदहाच्‍या सुमारास शेगाव बसस्‍थानकावर घडली.

झाले असे, की शेगाव आगारात संजय ज्ञानदेव वडतकर बस वाहक आहेत. ते व्यंकटेशनगरात राहतात. आज सकाळी सातला त्यांची ड्युटी शेगाव- अकोला बसवर लागली. अकोला येथून परतत असताना बाळापूरवरून अंदाजे 65 वर्षीय व्यक्‍ती शेगावला जाण्यासाठी बसमध्ये बसला. बस शेगाव बसस्थानकावर सुमारे सकाळी 10:30 च्या सुमारास पोहोचली. यावेळी प्रवासी खाली उतरले. मात्र हा प्रवासी सीट क्रमांक 33 वर जागीच बसलेला दिसला. त्‍याला झोप लागलेली असेल म्‍हणून वाहक वडतकर यांनी त्‍याला आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नाही. हालचालही झाली नाही. त्‍यामुळे वडतकर यांनी त्‍याच्‍या तोंडावर पाणी मारले व हलवले. मात्र तरीही हालचाल न झाल्‍याने तो दगावला असावा, असा संशय त्‍यांना आला. त्‍यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्‍यानंतर मृतदेहासह बस सईबाई मोटे रुग्‍णालयात नेण्यात आली. मृतदेह रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. अद्याप त्‍याची ओळख पटलेली नाही. त्‍याचे वर्णन असे ः अंगात पांढरे शर्ट, काळी पॅन्ट, दाढी वाढलेली पांढरी, डोक्यावरचे केस पांढरे वर टक्कल, उजव्या हातात पांढऱ्या धातूचे कडे आणि धागा बांधलेला आहे. उजव्या हातावर ॐ गोंदलेले असून, पायात रबरी चप्पल, उंची पाच फूट. अशा वर्णनाच्या व्यक्‍तीची ओळख कोणालाही पटल्यास शेगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास पीएसआय श्रीमती गोसावी करत आहेत.

नांदुऱ्यातही आढळला अनोळखी मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील तिरुपती टॉवरमधील देशी दारूच्या दुकानासमोर आज, 7 जुलैला दुपारी 1 च्‍या सुमारास अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह आढळला आहे. त्‍याचे अंदाजे वय 60 वर्षे आहे. त्‍याच्‍याबाबत कोणतीही माहिती असल्यास नांदुरा पोलीस ठाण्याला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक सिद्धेश्वर उमाळे (मो. 8308906616) तसेच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निबोळकार मो. 9422883911, 9405778850 यांनी केले आहे.