चांगले नांदवू म्‍हणून घरी बोलावून घेतले अन्‌ हातपाय धरून तोंडात विष ओतले!; विवाहितेवर ओढावला जीवघेणा प्रसंग!!; लोणार तालुक्‍यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांगले वागवू म्हणून विवाहितेला घरी बोलावून सासरच्यांनी हातपाय धरून विष तोंडात ओतल्याची धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील वढव येथे 29 जूनला दुपारी घडली. सध्या विवाहितेवर लोणारमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणार पोलिसांनी विवाहितेच्या जबाबावरून पती, सासू, दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश प्रभाकर चाटे (पती), सुमन प्रभाकर चाटे (सासू), दीर …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चांगले वागवू म्‍हणून विवाहितेला घरी बोलावून सासरच्यांनी हातपाय धरून विष तोंडात ओतल्याची धक्‍कादायक घटना लोणार तालुक्‍यातील वढव येथे 29 जूनला दुपारी घडली. सध्या विवाहितेवर लोणारमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणार पोलिसांनी विवाहितेच्‍या जबाबावरून पती, सासू, दीराविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गणेश प्रभाकर चाटे (पती), सुमन प्रभाकर चाटे (सासू), दीर कार्तिक प्रभाकर चाटे (तिघे रा. वढव, ता. लोणार) अशी आरोपींची नावे आहेत.

सौ. सीमा गणेश चाटे (21) हिने जबाब दिला की, तिचे लग्‍न सन 2018 मध्ये झाले होते. पतीपासून तिला मूलबाळ नाही. पती व दीर दोघांना दारू पिण्याची सवय आहे. ते कामधंदा करत नाहीत. दारू पिऊन नेहमी मारहाण करून त्रास देत असल्याने सहा महिन्यांपूर्वी तिच्‍या वडिलांनी तिला वढव येथून माहेरी कवडा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे नेले होते. 29 जूनला सकाळी 7 वाजता वडील पांडुरंग राख यांच्‍या मोबाइलवर सासू सुमनबाईचा फोन आला. ती म्हणाली की, सीमाला आम्ही नांदवतो. तुम्ही तिला घेऊन या. सीमानेही वढव येथे जायचे आहे, असे सांगितल्याने तिच्‍या वडिलांनी तिला खासगी गाडी करून वढवला आणले. सोबत आई सौ. रंजना राखही होती. हे सर्व साडेअकराला वढवला आले. तिचे मामा संतोष दराडे (रा. पार्डादराडे) हेसुध्दा वढवला आले. सर्वांनी तिला वढव येथे सोडले. त्यावेळी सासू सुमन, पती गणेश, दीर कार्तीक घरीच होते. तिला सासरी सोडल्यानंतर माहेरची मंडळी निघून गेली. ते गेल्यानंतर सासू तिला म्हणाली, की तुला वढवला नांदायला यायचे होते तर तू एकटी का नाही आली? तुझे आई-वडील, मामा यांना का आणले? ते आमचे काय करणार, असे म्हणून शिविगाळ सुरू केली.

दीर कार्तिकने तिचे दोन्ही हात धरले व सासू सुमनने दोन्ही पाय धरले. पती गणेशने घरातील शेतीउपयोगी औषधीचा डब्बा आणून विषारी औषध तिच्‍या तोंडात ओतले, असे तिने जबाबात म्‍हटले आहे. औषध तोंडात ओतल्यानंतर त्यांनी सोडून दिले. सीमाने तातडीने मोबाइलवरून तिच्‍या मामाला घडलेली घटना सांगितली. त्‍यामुळे आई-वडील, मामा पुन्‍हा तिच्‍याकडे वढवला येण्यास धावले. त्‍यांनी तिला गाडीत टाकून लोणार येथे हॉस्पिटलमध्ये आणून भरती केले, असेही जबाबात म्‍हटले आहे. पती गणेश, दीर कार्तिक, सासू सुमन घरी मारहाण करून खर्चाला पैसे आण, असे म्हणून नेहमी त्रास देत होते, असेही तिने जबाबात सांगितले. पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सुरज काळे करत आहेत.