चार तास विहिरीत खांबाला धरून, ना बाहेर येता येईना, ना कुणी मदतीला येईना… अखेर पाशाभाईंनी तारले!; मलकापूर पांग्रा येथील घटना

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनामुळे धुलिवंदनाचा उत्साह शहरांत दिसला नसला तरी ग्रामीण भागात मात्र कोरोनाला तसे फारसे कुणी मनावर घेतल्याचे दिसले नाही. मलकापूर पांग्रातही धुलिवंदन खेळून नंतर पार्टीत रममाण झालेल्या एका युवकाला मध्येच पोहण्याची लहर आली आणि लगेच त्याने कहर करत कपडे काढून विहिरीत उडी घेतली. पण मदिरेने प्रभाव दाखवायला सुरुवात …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : कोरोनामुळे धुलिवंदनाचा उत्‍साह शहरांत दिसला नसला तरी ग्रामीण भागात मात्र कोरोनाला तसे फारसे कुणी मनावर घेतल्याचे दिसले नाही. मलकापूर पांग्रातही धुलिवंदन खेळून नंतर पार्टीत रममाण झालेल्या एका युवकाला मध्येच पोहण्याची लहर आली आणि लगेच त्‍याने कहर करत कपडे काढून विहिरीत उडी घेतली. पण मदिरेने प्रभाव दाखवायला सुरुवात केल्याने त्‍याला काही बाहेर येता येईना. तब्‍बल चार तास तो विहिरीत होता. अखेर त्‍याची आरडाओरड एकाच्‍या कानी पडली आणि त्‍यांनी मग तातडीने गावात वर्दी देत या युवकाला बाहेर काढले. मलकापूर पांग्रा येथे आज, 29 मार्चला सायंकाळी ही घटना घडली.

झाले असे, की मित्रांसोबत धुलिवंदनाची पार्टी करत असतानाच 30 वर्षीय एक युवक दुपारी 3 वाजता विहिरीजवळ आला आणि त्‍याने पोहण्यासाठी कपडे काढून विहिरीत उडी घेतली. मात्र त्‍यानंतर त्‍याला काही बाहेर येईना. त्‍याने आरडाओरड केली. पण आजूबाजूला कुणीच नसल्याने कुणी मदतीलाही येईना. चार तास सतत मदतीसाठी पुकारा केल्यानंतर तिथून शेतात जात असलेल्या पाशाभाई यांच्‍या कानी ही ओरड आली. त्‍यांनी तातडीने गावात ही माहिती दिली आणि मग मदतीसाठी ग्रामस्‍थ धावले. त्‍यांनी त्‍याला बाहेर काढले. दुपारी 3 पासून तो विहिरीत होता. त्‍याला रात्री साडेआठच्‍या सुमारास बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत तो विहिरीतील खांबाला धरून होता. त्‍याला बाहेर काढण्यासाठी शेख एजाज शेख लियास, शेख अकील शेख फत्तू, शेख मुशीर शेख अबरार यांनी तातडीने हालचाली केल्या. या घटनेबाबत त्‍या युवकाशी संवाद साधला असता तो म्‍हणाला, की दुपारी तीनला मित्रांना सोडून निघालो. बाजूला असलेल्या विहिरीत पोहण्याचा मोह झाला. कपडे काढून विहिरीत उडी मारली. पहिल्यांदा असे वाटले की तिथली दोरी पुरेल. मी वर येऊ लागलो तर येता येईना. पाच ते दहा वेळेस प्रयत्न केला. शेवटी एका खांबाला धरून थांबलो. रात्री आठ- सव्वा आठ आवाज देत होतो. अखेर रात्री शेतात जाणाऱ्या पाशाभाईंनी आवाज ऐकला. त्‍यांनी तातडीने गावकरी व नातेवाइकांना कॉल करून बोलावले.