चिखलीचा लाचखोर पीएसआय स्‍वप्‍नील रणखांब ‘एसीबी’च्‍या जाळ्यात!; 10 हजार घेताना रंगेहात अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली पोलिसांच्या लौकिकाला बट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील जगदेवराव रणखांब (29) याला अखेर लाचखोरीच भोवली आहे. जुगाराच्या गुन्ह्यातून हॉटेलमालकाचे नाव वगळण्यासाठी 10 हजार रुपये घेताना त्याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. चिखली- खामगाव रोडवरील हॉटेल अमृततुल्यच्या आवारात आज, 1 एप्रिलला सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली पोलिसांच्‍या लौकिकाला बट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक स्‍वप्‍नील जगदेवराव रणखांब (29) याला अखेर लाचखोरीच भोवली आहे. जुगाराच्या गुन्ह्यातून हॉटेलमालकाचे नाव वगळण्यासाठी 10 हजार रुपये घेताना त्‍याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. चिखली- खामगाव रोडवरील हॉटेल अमृततुल्यच्या आवारात आज, 1 एप्रिलला सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

रणखांब हा मोहदी (ता. महागाव जि. यवतमाळ) येथील मूळचा असून, सध्या चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 23 मार्चला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेल अमृततुल्यवरील जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. याप्रकरणी  हॉटेल मॅनेजरसह  8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास रणखांब याच्‍याकडे देण्यात आला होता. त्‍याने हॉटेलमालकाला गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र हॉटेलमालकांना लाच द्यावयाची  नसल्याने त्यांनी ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. एसीबीने पडताळणी केल्यानंतर आज सापळा रचला. सापळ्यात रणखांब  10 हजाराची लाच घेताना अलगद अडकला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे  पोलीस अधीक्षक  विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पो.ना. विलास साखरे, रवींद्र दळवी, पोलीस शिपाई जगदीश पवार, विनोद लोखंडे, चालक पोलीस शिपाई  मधुकर गरड यांनी पार पाडली.

कुणी लाच मागत असल्यास…

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्याच्यावतीने एखाद्या खासगी व्‍यक्‍तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्र: 8888768218 टोल फ्री क्रमांक-1064