चिखलीच्‍या “हा’ प्रतिष्ठीत व्यापारीही “त्‍या’ कारणास्तव फसला ३ लाखांनी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. चिखलीतील प्रतिष्ठीत व्यापारी व पोपट ब्रदर्सचे संचालक बिपीन पोपट यांचीही तब्बल दोन लाख ९९ हजार ६७६ रुपयांनी फसवणूक झाली आहे. त्यांच्या बँक खात्यातून ही भलीमोठी रक्कम लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात …
 
चिखलीच्‍या “हा’ प्रतिष्ठीत व्यापारीही “त्‍या’ कारणास्तव फसला ३ लाखांनी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. चिखलीतील प्रतिष्ठीत व्यापारी व पोपट ब्रदर्सचे संचालक बिपीन पोपट यांचीही तब्बल दोन लाख ९९ हजार ६७६ रुपयांनी फसवणूक झाली आहे. त्यांच्या बँक खात्यातून ही भलीमोठी रक्कम लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

बिपीन दयालाल पोपट (६३, रा. गांधीनगर, चिखली) यांचे चिखलीत पोपट ब्रदर्स नावाचे प्रतिष्ठान आहे. त्यांचे स्टेट बँकेच्‍या चिखली शाखेत खाते आहे. बँकेत पोपट ब्रदर्स या नावाने व्यावसायिक वापरासाठी कॅश क्रेडिट खाते उघडले आहे. मोबाइल बँकिंगद्वारे ते या खात्यावरून व्यवहार करत होते. ३० जूनला ऑनलाइन बँकिंग व्यवहार करण्यात अडचण येत असल्याने त्यांनी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. गुगलवर बँक सर्व्हिस सेंटर या नावाने असलेल्या ९३३९२२७४२१ या नंबरवर फोन केला. त्‍यावेळी समोरून बँक खात्याचा तपशील मागण्यात आला. मात्र पोपट यांनी तपशील दिला नाही. नंतर त्याच क्रमांकावरून वेळोवेळी बँक खात्याचा तपशील मागितल्यावरही पोपट यांनी तपशील दिला नाही. त्यानंतर ७ जुलै रोजी त्याच नंबरवरून पुन्हा पोपट यांना कॉल आला.

तुमच्या खात्यातून कोणीतरी व्यक्ती पैसे काढत आहे. तुमचे आधार कार्ड व पॅन कार्डचा तपशील द्या. मी बँक खाते ब्लॉक करतो, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर पोपट यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्डचा तपशील समोरील व्यक्तीला दिला. त्यानंतर त्याच दिवशी पोपट यांनी बँकेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट घेतले असता त्यांच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ६७६ व १ लाख ५० हजार असे एकूण २ लाख ९९ हजार ६७६ रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्‍यांनी ८ जुलै रोजी याप्रकरणाची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात केली होती. चौकशीअंती पोलिसांनी १७ जुलै रोजी याप्रकरणी ९३३९२२७४२१ या मोबाईल क्रमांक धारक व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.