चिखलीतील चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर राज्यात खळबळ उडविणाऱ्या चिखलीतील ९ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने बलात्काऱ्यांना सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. समाजासाठी विघातक असल्याचा पुरावा अभिलेखावर दिसून न आल्याने दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना उर्वरित आयुष्य संपेपर्यंत कठोर कारावासाची …
 
चिखलीतील चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर राज्यात खळबळ उडविणाऱ्या चिखलीतील ९ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने बलात्काऱ्यांना सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. समाजासाठी विघातक असल्याचा पुरावा अभिलेखावर दिसून न आल्याने दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना उर्वरित आयुष्य संपेपर्यंत कठोर कारावासाची (आजन्म) शिक्षा सुनावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल, ७ सप्टेंबर रोजी हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपी सागर बोरकर व निखिल गोलाईत यांना दिलासा मिळाला असला तरी पीडित चिमुकलीच्या पाठीशी उभे राहणाऱ्या हजारो चिखलीकरांसाठी, वेगवान तपास करणाऱ्या पोलिसांसाठी, पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हा निर्णय धक्कादायक असाच आहे.

२६ एप्रिल २०१९ ला चिखलीत एक क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली होती. रात्री ९ च्या सुमारास कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या आवारात आपल्या आई-वडिलांसह झोपलेल्या ९ वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर महाबीजच्या परिसरात अत्याचार करण्यात आले होते. रात्री पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांना ती चिमुकली जखमी अवस्थेत दिसून आल्यावर प्रकार समोर आला होता. प्रचंड गरिबी, पाठीवर पोत्याचे ओझं वाहणारा हमाली करणार बाप आणि गतिमंद असलेली आई… पीडितेचा संपूर्ण परिवारच या घटनेने हादरला होता. या घटनेनंतर चिखली शहराने एकत्र येऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. एक दिवस चिखली शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांनी लगेच तातडीने कारवाई केली.

याप्रकरणातील आरोपी सागर बोरकर याला एका घराच्या गच्चीवरून पहाटे पाचला ताब्यात घेतले होते. त्याचे कपडे रक्ताने माखलेले असल्याने त्याला पुराव्यासह अटक करण्यात आली होती. निखिल गोलाईत याला घटनेच्या दुसऱ्या दिवशीच अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा वेगाने तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. १५ साक्षीदारांनी व्यवस्थित साक्ष देऊन प्रकरणाला बळकटी दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून १३ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सागर बोरकर आणी निखिल गोलाईत यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर चिखली शहरातील पोलीस ठाण्यावर रोषणाई करण्यात आली होती. चिखलीत फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. फाशीची शिक्षा कन्फर्म करण्यासाठी विशेष न्यायालयाने प्रकरण उच्च न्यायालयात पाठविले. आरोपींनी सुद्धा त्यांच्यातर्फे फौजदारी अपील दाखल केले. या सुनावणीअंती दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य संपेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. व्ही. एम. देशपांडे व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.