चिखलीत सर्वसुविधांयुक्‍त कोविड रुग्‍णालय होण्याची आशा; आमदार श्वेताताई महाले यांच्‍या मागणीमुळे पालकमंत्र्यांनी दिले प्रस्‍ताव सादर करण्याचे आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखलीत सर्व सुविधांनी युक्त समर्पित कोविड रुग्णालयाची मागणी वर्षभरापासून आमदार सौ. श्वेताताई महाले करत आहेत. त्यावर 19 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.14 एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोरोनाविषयक उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखलीत सर्व सुविधांनी युक्‍त समर्पित कोविड रुग्णालयाची मागणी वर्षभरापासून आमदार सौ. श्वेताताई महाले करत आहेत. त्यावर 19 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
14 एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोरोनाविषयक उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली येथे समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी पुन्‍हा केली होती. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सांगळे, अन्न व औषधी प्रशासनाचे श्री. घिरके यांची व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असतानाही चिखली तालुक्यात एकही समर्पित कोविड रुग्णालय नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना फार हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी मागील वर्षीपासून चिखली येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सर्व सुविधांनी युक्त समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा भार बुलडाणा, खामगाव येथील कोविड रुग्णालयावर पडल्याने अनेक रुग्णांना वेळवर बेड मिळत नाही. ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासाठी जेव्हढा कोरोना जबाबदार आहे तेव्हढा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार ही जबाबदार असल्याचा आरोप त्‍यांनी केला होता.