चिखली तालुक्‍यात जनावरे चोरून नेणारे रॅकेट तर नाही?; ४ बैल, १ गाय, २५ बकऱ्या चोरट्यांनी केल्या गायब!, टाकरखेड, चांधई, चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यात जनावरे चोरून नेणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातून चार दिवसांत तब्बल ४ बैल, १ गाय आणि २५ बकऱ्या चोरीस गेल्याचे समोर आले आहे. टाकरखेड मुसलमान, चांधई आणि चिखली शहरात या घटना घडल्या आहेत. वाढत्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले असून, पोलिसांनी या जनावरे चोरीच्या घटनांचा तातडीने छडा …
 
चिखली तालुक्‍यात जनावरे चोरून नेणारे रॅकेट तर नाही?; ४ बैल, १ गाय, २५ बकऱ्या चोरट्यांनी केल्या गायब!, टाकरखेड, चांधई, चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्‍यात जनावरे चोरून नेणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तालुक्‍यातून चार दिवसांत तब्‍बल ४ बैल, १ गाय आणि २५ बकऱ्या चोरीस गेल्याचे समोर आले आहे. टाकरखेड मुसलमान, चांधई आणि चिखली शहरात या घटना घडल्या आहेत. वाढत्‍या घटनांमुळे शेतकरी धास्तावले असून, पोलिसांनी या जनावरे चोरीच्‍या घटनांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

विश्वनाथ कांशीराम शिंदे (५१, रा. टाकरखेड मुसलमान ता. चिखली) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की २६ ऑगस्‍टच्‍या रात्री ते २७ ऑगस्‍टच्‍या सकाळी सहाच्‍या दरम्‍यान त्‍यांच्‍या टिनशेडमधून चोरट्यांनी २१ बकऱ्या व ४ बोकड (किंमत २ लाख रुपये) चोरून नेले. शिंदे यांचे टिनशेड गावाच्‍या वेशीजवळ रोडवर आहे. हीच संधी चोरट्यांनी साधली. मोठ्या वाहनातून या बकऱ्या चोरून नेल्याची शक्‍यता ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केली. तब्‍बल २ लाख रुपयांच्‍या बकऱ्या चोरीस गेल्याने हा शेतकरी हैराण झाला असून, एवढे मोठे नुकसान सहन करण्याची या शेतकऱ्याची क्षमता नाही. पोलिसांनी लवकरात लवकर बकऱ्यांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. घटनेचा तपास पोहेकाँ सुमेरसिंह ठाकूर करत आहेत.

चिखली शहरातून तीन बैल, एका गायीची चोरी
चिखली शहरातील बैल बाजारात जनावरे विक्रीसाठी आलेल्या राजूरच्‍या व्यापाऱ्याचे तीन बैल चोरीस गेले. ते बैलांचा शाेध घेताना आणखी एका शेतकऱ्याची गायसुद्धा चोरीला गेल्याचे समोर आले. या चारही जनावरांच्‍या चोरीची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेख युसुफ शेख मुसा (६१, रा. राजूर ता. बुलडाना) हे बैल व्यापारी असून, बैल विकत घेऊन ते वेगवेगळ्या बाजारात जाऊन विकतात. २९ ऑगस्‍टला ते चिखलीत आले होते. बैलगाडी व सहा बैल घेऊन संध्याकाळी बाजारात आले. लकी फ्रूट सप्लायर यांच्‍या गोडावूनसमोर त्‍यांनी बैल बांधले होते. त्‍यांचा मुलगा शेख अनीस शेख युसूफ हाही सोबत होता. रात्री बैलांना चारापाणी करून ते लकी फ्रूटच्‍या गोडावूनमध्येच झोपले. पहाटे चारला बैलांचा आवाज झाल्याने त्‍यांनी उठून पाहिले असता सहापैकी तीनच बैल दिसले. तीन बैल गायब असल्याने त्‍यांनी शोध सुरू केला. त्‍याचवेळी कृष्णा व्यंकटराव गोलांडे (रा. जिजाऊनगर, िचखली) हे त्‍यांना भेटले. त्यांनीसुध्दा त्‍यांची सहा वर्षे वयाची एक गाय चोरीला गेल्याचे सांगितले. एकूण ६२ हजार रुपयांची ही जनावरे चोरी गेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

चांधईतून बैल चोरी
चांधई (ता. चिखली) येथील शालिकराम रामजी तेलंग्रे (६०) यांच्‍याकडे दोन बैल, एक गाय व एक वासरी अशी जनावरे असून, ही जनावरे ते रोज घरासमोरील गोठ्यात बांधत असतात. २८ ऑगस्‍टला रात्रीतून एक बैल चोरांनी चोरून नेला. दिवसभर त्‍यांनी गाव परिसरात शोध घेतला. मात्र बैल मिळून आला नाही. ३० हजार रुपयांचा बैल चोरून नेल्याची तक्रार तेलंग्रे यांनी चिखली पोलीस ठाण्यात केली आहे.