चिखली तालुक्‍यात ढगफुटी सदृश पाऊस!; आमखेडचा तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज, 28 जूनला चिखली तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ माजवला. अवघ्या दोन तासांत नदी, नाले पातळी सोडून वाहू लागले. तलाव, नदी फुटल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त गावांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज, 28 जूनला चिखली तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ माजवला. अवघ्या दोन तासांत नदी, नाले पातळी सोडून वाहू लागले. तलाव, नदी फुटल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त गावांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.

चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा या गावांत अक्षरशः ढगफुटी सदृश्य चित्र होते. संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान बरसलेला असा तुफान पाऊस यापूर्वी कधी बघितला नसल्याचे ज्‍येष्ठांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. आमखेड (ता. चिखली) येथील तलाव फुटल्याने पेरणी झालेली शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. गांगलगाव येथील नदी पातळी ओलांडून वाहत होती. नदी फुटल्यानेही अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. शेतात कबरेपर्यंत पाणी साचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांवर ओढवले होते. मात्र आज झालेल्या पावसाने फायदा होण्याऐवजी पेरलेली जमीनच खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पंचनाम्‍यांचे आदेश…
चिखली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. आमखेडचा तलाव फुटल्याने जमीन खरडली आहे. नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

अजितकुमार येळे, तहसीलदार, चिखली