चिखली पालिका सभागृहाला स्व. भगवानदासजी गुप्त यांचे नाव

नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी केली होती मागणीचिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगर पालिकेच्या मुख्य सभागृहाला स्व. भगवानदासजी गुप्त यांचे नाव देण्यात आले आहे. तसा नामकरणाचा ठराव आज, 27 जानेवारी रोजी मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी तशी मागणी केली होती.स्व. भगवानदासजी गुप्त यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्र, कृषी आदी वेगवेगळ्या …
 

नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी केली होती मागणी
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः
चिखली नगर पालिकेच्या मुख्य सभागृहाला स्व. भगवानदासजी गुप्त यांचे नाव देण्यात आले आहे. तसा नामकरणाचा ठराव आज, 27 जानेवारी रोजी मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी तशी मागणी केली होती.
स्व. भगवानदासजी गुप्त यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्र, कृषी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली भरीव व उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांच्या नावाचा प्रस्ताव अविरोधपणे सर्वपक्षीय सदस्यांनी मंजूर केला. स्व. भगवानदासजी गुप्त यांचे कार्य चिखलीकरांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया गोविंद देव्हडे यांनी या संदर्भात व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात चिखली नगर पालिकेचे सदस्य म्हणूनही त्यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांनी चिखली परिसरात शिक्षण आणि सहकारी बँकेचे समृद्ध दालन उघडले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा व महाविद्यालये आज चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवत आहेत. याशिवाय चिखली अर्बन बँकेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यातील हजारो सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो आहे. स्व. लालाजींच्या या असामान्य कर्तृत्ववाची आठवण चिखलीकरांना सदैव रहावी व त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने आपण सदर मागणी केली होती, असे नगरसेवक गोविंद देव्हडे म्हणाले. ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल या प्रस्तावाचे सूचक गोविंद देव्हडे यांनी नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले आहेत.