चुलत सुनेनेच केली सासूची हत्‍या!; दागिन्यांचा हव्यास, अक्षरशः अंगावरून ओरबाडले होते, कानाचेही तोडले होते लचके!!, लोणार तालुक्‍यातील थरारक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भुमराळा (ता. लोणार) शिवारात वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना १९ सप्टेंबरला समोर आली होती. कासाबाई नारायण चौधरी (६५) यांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले होते, कानाचे लचके तोडले होते. कपाशी व तुरीच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला होता. खुन्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. कर्तव्यदक्ष जिल्हा …
 
चुलत सुनेनेच केली सासूची हत्‍या!; दागिन्यांचा हव्यास, अक्षरशः अंगावरून ओरबाडले होते, कानाचेही तोडले होते लचके!!, लोणार तालुक्‍यातील थरारक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भुमराळा (ता. लोणार) शिवारात वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना १९ सप्टेंबरला समोर आली होती. कासाबाई नारायण चौधरी (६५) यांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले होते, कानाचे लचके तोडले होते. कपाशी व तुरीच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला होता. खुन्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपासाचे निर्देश दिले होते. पोलिसांनी या खून प्रकरणी तिच्या चुलत सुनेला अटक केली. तिने खुनाची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. नंदाबाई उद्धव चौधरी (४२, रा. भूमराळा) असे आरोपी महिलेचे नाव असून, सोने-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी तिने चुलत सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.

नंदाबाई आणि कासाबाईंचे शेत शेजारी -शेजारीच आहे. दोघीही आपापल्या शेतात काम करत होत्या. मात्र १८ सप्टेंबरच्या सायंकाळी नंदाबाईने चुलत सासू कासाबाईंच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली. कानाचे लचके तोडून दागिने लांबविले. संध्याकाळ होऊनही कासाबाई घरी न परतल्याने शोध घेतला असता त्‍यांचा मृतदेह शेतातील तुरीच्या फाट्यात सापडला होता. १९ सप्टेंबर रोजी घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी श्वान हा नंदाबाईंच्या घराजवळ घुटमळत होता. पोलिसांनी गावात चौकशी केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नंदाबाईची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. अखेर नंदाबाईने खून केल्याची कबुली दिली. काल, २० सप्टेंबर रोजी नंदाबाईला अटक करण्यात आली.