चोराने देवालाही नाही सोडले… मग देवानेही त्‍याला नाही सोडले!; नांदुऱ्यातील हनुमान मूर्तीजवळील घटना; नांदुऱ्यात दोन, बुलडाण्यात एक चोरी

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा येथील हनुमान मूर्तीजवळील दानपेटी चोराने फोडली. पण काहीच मिनिटांत पकडला गेला. गस्तीवरील पोलिसांनी लोकांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. ही घटना आज, १५ जुलैला पहाटे समोर आली. श्री तिरुपती बालाजी संस्थानच्या सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गजानन निनाजी हळदे (३५, रा. सावरगाव नेहू) असे संशयित चोरट्याचे नाव …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा येथील हनुमान मूर्तीजवळील दानपेटी चोराने फोडली. पण काहीच मिनिटांत पकडला गेला. गस्‍तीवरील पोलिसांनी लोकांच्‍या मदतीने त्‍याला जेरबंद केले. ही घटना आज, १५ जुलैला पहाटे समोर आली. श्री तिरुपती बालाजी संस्थानच्‍या सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गजानन निनाजी हळदे (३५, रा. सावरगाव नेहू) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.

कैलास वासुदेव हरमकार (४७, रा. मोहता प्लॉट, नांदुरा) हे २००६ पासून संस्‍थानमध्ये सुपरवायझर म्‍हणून काम करतात. काल रात्री साडेनऊला ते सर्व दानपेट्या तपासून घरी आले होते. आज पहाटे तीनला त्‍यांना ट्रस्टचे अध्यक्ष नारायणसेठ उर्मी यांनी कॉल केला व सांगितले, की मंदिराची दानपेटी चोराने फोडली असून, चोराला पकडले आहे. त्‍याला सध्या पोलीस ठाण्यात त्‍याला नेले आहे. त्‍यामुळे हरमकार यांनी तातडीने हनुमान मूर्ती गाठली. तिथे पाहणी केली असता राम मंदिराचे गेट कडीमधून वाकून उघडलेले होते. त्‍यातील दान पेटीजवळ हनुमंताची गदा पडलेली तसेच मंदिरातील काचेची दान पेटी फोडलेली दिसली. त्यात असलेली अंदाजे दोन ते अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेलेली दिसली. इतर दानपेट्या जशास तशा होत्या. त्‍यानंतर हरमकार यांनी पोलीस ठाण्यात येऊन चोराविरुद्ध तक्रार दिली.

विशाल भोजनालयाच्या मालकावरही चोरट्याची वक्रदृष्टी!
रेल्वेस्‍टेशन चौकातील विशाल भोजनालयाचे मालक उमेश रमेश गणोदे (४०, रा.हेलगेनगर, बुलडाणा रोड नांदुरा) यांच्‍यावरही चोरट्याची वक्रदृष्टी पडली. त्‍यांचा महालक्ष्मीनगरात प्लॉट असून, या प्‍लॉटवर बांधकाम सुरू होते. त्‍यासाठी बोअर घेऊन त्‍यावर मोटार पंप बसवलेला होता. १३ जुलैला पावसामुळे काम बंद होते. काल, १४ जुलैला दुपारी ४ वाजता गणोदे हे प्‍लॉटवर गेले असता त्‍यांना मधील बोअरवेलमध्ये बसविलेला मोटार पंप, केबल, पाईप, दोरी व अन्य साहित्‍य चोरीस गेल्याचे आढळले. एकूण ३४ हजार रुपयांचे साहित्‍य चोरांनी चोरून नेले आहे. त्‍यामुळे गणोदे यांनी नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

बुलडाण्यात वेल्‍डिंग वर्कशॉप फोडले
वेल्‍डिंग वर्कशॉप फोडून चोरट्यांनी मशिनरीसह १८ हजार रुपयांचे साहित्‍य चोरून नेले. ही घटना इकबाल चौकातील जामा मशिदीजवळ काल, १४ जुलैला सकाळी समोर आला. वेल्डींग मशीन (किंमत ८ हजार रुपये), ड्रिल मशीन तीन नग (किंमत ६ हजार रुपये), ग्राइंडर मशीन दोन नग (किंमत ४ हजार रुपये) असा एकूण १८ हजार रुपयांचा माल चोरीस गेला. तपास एएसआय रमेश कानडजे करत आहेत. वर्कशॉप मालक नौशाद शाह बिस्मिल्ला शाह यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.