छोटीशी चूक..2 लाखांचा गंडा… पण पोलिसांनी पुन्‍हा फुलवले चेहऱ्यावर हास्य!; बुलडाणा शहर पोलिसांची कौतुकास्‍पद कामगिरी

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैसे काढल्यानंतर एटीएममध्ये विसरलेले डेबिट कार्ड भामट्याच्या हाती लागून त्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 20 वेळेस पैसे काढले. 2 लाख 6 हजार 600 रुपयांचा दणका केवळ छोट्याशा चुकीमुळे एका सामान्य नागरिकाला बसला. मात्र पोलिसांनी त्यांना केवळ धीरच दिला नाही तर त्यांची ‘अमानत’ सहिसलामत परत आणण्याचा विडाही उचलला. …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पैसे काढल्यानंतर एटीएममध्ये विसरलेले डेबिट कार्ड भामट्याच्‍या हाती लागून त्‍याने थोडेथोडके नव्‍हे तर तब्‍बल 20 वेळेस पैसे काढले. 2 लाख 6 हजार 600 रुपयांचा दणका केवळ छोट्याशा चुकीमुळे एका सामान्य नागरिकाला बसला. मात्र पोलिसांनी त्‍यांना केवळ धीरच दिला नाही तर त्‍यांची ‘अमानत’ सहिसलामत परत आणण्याचा विडाही उचलला. तब्‍बल तीन महिने चाललेल्या तपासचक्रातून त्‍यांनी कामगिरी फत्ते केलीच अन्‌ पैसे गमावल्याचे दुःख सोसणाऱ्या सामान्‍याच्‍या चेहऱ्यावर हास्‍यही फुलवले…!

झाले असे, की 1 डिसेंबर 2020 रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात विकास मल्लीकाअर्जुन क्‍यावल (रा. बुलडाणा) यांनी एटीएममध्ये कार्ड विसरल्यानंतर त्‍या कार्डच्‍या आधारे कुणीतरी पैसे काढल्याची तक्रार केली. त्‍यांच्‍या मोबाइलवर 2 हजार, अडीच हजार, 10 हजार असे एकूण 20 विड्रॉल झाल्याचे मेसेज प्राप्‍त झाले होते. या माध्यमातून भामट्याने तब्‍बल 2 लाख 6 हजार 600 रुपये त्‍यांच्‍या बँक खात्‍यातून गायब केले होते. पोलिसांनी तातडीने गुन्‍हा नोंदवून क्‍यावल यांना धीर देत तपासाची चक्रे गतिमान केली. या एटीएम कार्डद्वारे बुलडाणा येथील एटीएममधून 2000 रुपये, एचपी पेट्रोलपंपावरून 2500 रुपये व मोताळा येथील ग्राहक सेवा केंद्रावरून 10,100 रुपये, मलकापूर व जळगाव येथूनही पैसे काढले होते. पोलिसांनी पंजाब नॅशनल बँकेच्‍या बुलडाणा शाखेला पत्र देऊन घटनेचे सीसीटीव्‍ही फूटेज मागवले. त्‍यात एटीएम कार्ड भामट्याने घेतल्याचे दिसून आले. त्‍यानंतर एचपी पेट्रोलपंपाचे सीसीटीव्‍ही फूटेज तपासण्यात आले. त्‍यात भामट्याचा कारचा नंबर टिपला गेला होता. एमएच 19 क्‍यू 7772 अशा क्रमांकाच्‍या कारचा मग शोध सुरू झाला. कारच्‍या मालकाचा शोध घेतला असता त्‍याने ही कार काशिनाथ प्रभू चव्‍हाण (30, रा. पारिजात कॉलनी, महाबळ, जळगाव) याला वापरण्यासाठी दिल्याचे सांगितले. काशिनाथला ताब्‍यात घेऊन विचारपूस केली असता त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली. त्‍याच्‍याकडून 2 लाख 6 हजार 600 रुपयांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात त्‍याला अटक करून न्‍यायालयात हजर करण्यात आले. न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या अधिन राहून क्‍यावल यांना त्‍यांचे पैसे परत करण्यात आले. या गुन्ह्याचा अत्‍यंत हुशारी आणि सतर्कने तपास केला तो पोलीस निरिक्षक प्रदीप साळुंके, नापोकाँ महादेव इंगळे, पोकाँ अमोल शेजोळ यांनी. त्‍यांना मार्गदर्शन लाभले अर्थातच कर्तव्यदक्ष जिल्‍हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांचे.