जनुना तलाव फिरून परतताना आयशरने उडवले; दुचाकीस्वार दोन तरुणांसह तरुणी जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयशर वाहनाने मोटारसायकलला उडवले. यात एका तरुणीसह दोन तरुण जखमी झाले. ही घटना खामगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जनुना चौफुलीवर काल, १५ ऑगस्टला दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सचिन सुदर्शन काळे, हर्षल सुपडा वाडेकर (दोन्ही रा. गवंढाळा, ता. खामगाव), प्रतीक्षा निंबाजी रणित (रा. जळका भडंग ता.खामगाव) अशी जखमींची नावे …
 
जनुना तलाव फिरून परतताना आयशरने उडवले; दुचाकीस्वार दोन तरुणांसह तरुणी जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयशर वाहनाने मोटारसायकलला उडवले. यात एका तरुणीसह दोन तरुण जखमी झाले. ही घटना खामगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जनुना चौफुलीवर काल, १५ ऑगस्‍टला दुपारी साडेचारच्‍या सुमारास घडली.

सचिन सुदर्शन काळे, हर्षल सुपडा वाडेकर (दोन्ही रा. गवंढाळा, ता. खामगाव), प्रतीक्षा निंबाजी रणित (रा. जळका भडंग ता.खामगाव) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणात सागर महादेव वावगे (२८, रा. गोंधनापूर, ता. खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून, त्‍यावरून शिवाजीनगर पोलिसांनी आयशर वाहनाच्‍या (MH 40 BG 6031) चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. काल सकाळी साडेदहाला सागर वावगे यांच्‍याकडे भाचा सचिन काळे आला. त्‍याने पीक फवारणीच्या पंपाचे सामान आणण्यासाठी खामगावला जायचे असून, त्‍यासाठी त्‍यांची मोटारसायकल मागितली. तो खामगाव येथे मोटारसायकल घेऊन निघून गेला.

नंतर संध्याकाळी पाचच्‍या सुमारास सचिनचा फोन सागर वावगे यांना आला व त्‍याने त्‍याचा जनुना चौफुलीवर अपघात झाला असून, उपचारासाठी खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात दाखल केलेले असल्याचे सांगितले. त्‍यामुळे सागर वावगे तातडीने घटनास्‍थळी पोहोचले. जनुना चौफुलीवर आयशर रस्त्याच्‍या मधोमध उभे होते. या वाहनासमोरच मोटार सायकल (क्र. MH 28 BL 8404) पडलेली दिसली. नंतर वावगे हे सामान्य रुग्णालयात गेले. तेव्‍हा सचिनने सांगितले, की तो, त्याचा मित्र हर्षल व त्याची मैत्रिण प्रतीक्षा असे तिघे जण जनुना तलाव येथे फिरायला गेले होते. परतताना लाल आयशरने त्‍यांना धडक दिली. यात तिघे रस्‍त्‍यावर पडून जखमी झाले. सचिनच्‍या डोक्याला, तोंडाला, दोन्ही पायांना मार लागला आहे. हर्षलच्‍या हातापायाला खरचटले आहे. त्याची मैत्रिण प्रतीक्षाला तोंडाला मार लागला असून हातापायाला खरचटले अाहे. सहायक फौजदार श्री. सातव करत आहेत.