जळगाव जामोद वगळता मलकापूर, नांदुरा, मेहकर नगरपालिकांच्या विषय समित्यांवर महाविकास आघाडीचा बोलबाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, मेहकर नगर परिषदांच्या विषय समित्यांची निवड 22 जानेवारीला झाली. जळगाव जामोदमध्ये 5 समित्या भाजपकडे तर एक समिती शिवसेनेकडे राहिली. या नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मलकापूरमध्ये विषय समित्यांवर विरोधकांनाही स्थान मिळाले आहे. या नगर परिषदेवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. नांदुरा नगरपालिकेत सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, मेहकर नगर परिषदांच्या विषय समित्यांची निवड 22 जानेवारीला झाली. जळगाव जामोदमध्ये 5 समित्या भाजपकडे तर एक समिती शिवसेनेकडे राहिली. या नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मलकापूरमध्ये विषय समित्यांवर विरोधकांनाही स्थान मिळाले आहे. या नगर परिषदेवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. नांदुरा नगरपालिकेत सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाली. मेहकरमध्ये पाचही समित्यावर शिवसेनेचा वरचष्मा राहिला.
जळगाव जामोद
जळगाव जामोद नगरपालिकेत पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सौ. सविता शरद खवणे, बांधकाम समिती सभापतीपदी सौ. सविता अनिल कपले, आरोग्य समिती सभापतीपदी मांगीलाल खेमराज भन्साली, नियोजन समिती सभापतीपदी आशिष राजेंद्र सारसर यांची निवड झाली. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे रमेश तायडे यांची शिक्षण समिती सभापतीपदी निवड झाली. स्थायी समिती सभापतीपदी सौ. सीमा कैलास डोबे यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी रेखा वाणी, नायब तहसीलदार सुशील भोगे, न. प.चे लिपिक उमेश काकड यांनी सहकार्य केले.
मलकापूर
मलकापूर नगरपरिषदेतील विषय समित्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम न.प.च्याच छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ अध्यक्षस्थानी होते. यात पाणीपुरवठा सभापतीपदी अनिल शिवरतन गांधी, बांधकाम समिती सभापतीपदी सौ. पूजा गोपाल राठी, आरोग्य समिती सभापतीपदी मो. जाकीर मो. इलियास मेमन, नियोजन व शहर विकास समिती सभापतीपदी सलमा बानो शेख इम्रान, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. छायाताई शंकरराव पाटील तर उपसभापतीपदी मेहरून्नीसा शख रफीक, शिक्षण सभापतीपदी पदसिद्ध न. प. उपाध्यक्ष रशिद खॉ जमादार यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सदस्यपदी काँग्रेसचे गटनेते राजेंद्र वाडेकर, सौ. मंगलाताई श्रीकृष्ण पाटील, सनाउल्लखाँ रफीकउल्लाखाँ जमादार यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी रमेश ढगे, उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे, संजय मांडवेकर, मिलिंद कंडारकर, पुरुषोत्तम देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
नांदुरा
नांदुरा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर आमदार राजेश एकडे यांच्या महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी सहकार्य केले. अर्थ व नियोजन समिती सभापतीपदी न.प. उपाध्यक्ष लालाभाऊ इंगळे, पाणीपुरवठा सभापती अजय घनोकार, आरोग्य समिती सभापतीपदी संजय टाकळकर, बांधकाम समिती सभापतीपदी सौ. हाजी नसीम बानो शेख मुक्तार, शिक्षण समिती सभापतीपदी सौ. समीना खान मोहतेशाम रजा यांची बिनविरोध निवड झाली.
मेहकर
मेहकर नगरपालिकेच्या विषय समित्यांवर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे वर्चस्व राहिले. न.पा.त शिवसेना 14, काँग्रेस 10 व नगराध्यक्ष काँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे. सहा विषय समित्यांचे सभापती निवडण्यात आले. त्यात पाच जागा शिवसेनेकडे राहिल्या. बांधकाम सभापतीपदी उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया, शिक्षण समिती सभापतीपदी सौ. शारदा समाधान सास्ते, पाणी पुरवठा सभापतीपदी डॉ. दीपिका रवीराज रहाटे, आरोग्य सभापतीपदी हलिमा हनीफ गवळी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी तौफीक कुरेशी, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या खुर्शीदबी वली महम्मद खाँ विजयी झाल्या. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे गटनेते संजय जाधव व नगरसेवक ओम सौभागे यांची निवड झाली. काँग्रेसकडून स्थायी समिती सभापतीपदी सुनीता ढाकरके यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेस गटनेते अलिम ताहेर आदींसह काँग्रेस-शिवसेनेचे गटनेतेहजर होते.