जळगाव जिल्ह्यातून “या’ खास कामासाठी त्‍याने गाठले मोताळा!; “एलसीबी’च्‍या सापळ्यात अडकला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अट्टल मोबाइल चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल १४ अँड्रॉइड मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. राजू दिया कोळी (५०, रा. चारधाना, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातून त्याने खास मोबाइल चोरीसाठीच मोताळा बसस्थानक गाठले होते. मात्र एलसीबीने काल, १९ जुलै रोजी रात्री सापळा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अट्टल मोबाइल चोरट्याला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल १४ अँड्रॉइड मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. राजू दिया कोळी (५०, रा. चारधाना, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातून त्‍याने खास मोबाइल चोरीसाठीच मोताळा बसस्थानक गाठले होते. मात्र एलसीबीने काल, १९ जुलै रोजी रात्री सापळा रचून त्‍याला ताब्यात घेतले.

राजू कोळीविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. मध्यप्रदेशातील शहापूर पोलीस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत.असा हा अट्टल सराईत गुन्हेगार मोताळा बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती “एलसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार एलसीबी पथकाने सापळा रचून मोताळा बसस्थानकावरून त्‍याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १४ अँड्रॉइड फोन आणि १ मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पो.ना. गजानन आहेर, लक्ष्मण कटक, पोकाँ गजानन गोरले,चालक पोकाँ सुधाकर बर्डे यांनी पार पाडली.