जिंकवणारी नव्हे लुटणारी चावी! तुम्‍हीही “win-key’ ॲपच्या नादी लागला असाल सावधान; चिखलीतील तरुणाला दीड लाखाने गंडवले!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गंडा घालणारी अनेक ॲप्स आहेत. मोठ्या कमाईचे आमिष दाखवून सुरुवातीला कमी पैसे, नंतर जास्त पैसे भरायला लावून फसवणूक केली जाते. “विन-की'(win-key) ॲपच्या माध्यमातून चिखलीच्या तरुणाला १ लाख ४७ हजार रुपयांनी गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गंडा घालणारी अनेक ॲप्स आहेत. मोठ्या कमाईचे आमिष दाखवून सुरुवातीला कमी पैसे, नंतर जास्त पैसे भरायला लावून फसवणूक केली जाते. “विन-की'(win-key) ॲपच्या माध्यमातून चिखलीच्‍या तरुणाला १ लाख ४७ हजार रुपयांनी गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गणेश काशीनाथ बाहेकर (रा. राऊतवाडी चिखली) असे फसवले गेलेल्या तरुणाचे नाव आहे. १४ मे रोजी तो या ॲपच्या नादी लागला तेव्‍हापासून
जाळ्यात फसत गेला. दीड लाख गेल्यावरच त्‍याला फसवले जात असल्याची जाणीव झाली. अर्धवेळ काम करण्यासाठीचा संदेश सुरुवातीला त्‍याच्‍या मोबाइलवर आला होता. त्‍याला व्‍हॉट्‌स ॲपच्‍या 917261065707 या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले गेले. १५ मे २०२१ रोजी त्‍याला Bet -365 हे ॲप डाऊनलोड करून त्यावर आयडी बनविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्‍याला विन की ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले गेले. त्यासाठी त्यांनीच लिंक पाठवली होती. विन की वर Bet -365 चा आयडी व पासवर्ड वापरून लाॅगीन करण्यास सांगण्यात आले. हे ॲप मोबाइलमध्ये २४ तास सुरू ठेवण्याची अट घालण्यात आली होती. पुढचे तीन दिवस रोज १०० रुपये मिळतील असे सांगण्यात आले. १५, १६ आणि १७ मे रोजी त्‍याच्‍या खात्‍यात रोज १०० रुपये जमा झाले. नंतर त्‍याला विचारणा करून हजार रुपयांचे रिचार्ज मारले तर जास्त पैसे मिळतील असे सांगण्यात आले. त्‍याने हजार रुपयांचे रिचार्ज मारले असता त्‍याचे १६०० रुपये झाले. पुन्‍हा संपर्क करून जास्त रिचार्ज मारण्यास सांगण्यात आले. त्‍यामुळे त्‍याने १० हजार रुपयांचे रिचार्ज मारले. असे करत करत गणेशने १ लाख ४७ हजार रुपयांचे रिचार्ज मारले. प्रत्‍यक्षात त्‍याच्‍या हातात काहीच आले नाही.

टेलिग्रामवर केला होता ग्रुप…
टेलिग्रामवर विन-की नावाने ग्रुप भामट्यांनी तयार केला असून, या ग्रुपमध्येही त्‍याला सामील करण्यात आले होते. त्या ग्रुपमध्ये तब्‍बल २३५ सदस्य असल्याने तेही अशाच पद्धतीने फसवले गेले असावेत. विशेष म्‍हणजे टेलिग्राच्‍या ग्रुपचे नियम होते, जसे की इंग्रजीत बोला अन्यथा ग्रुपमधून बाहेर काढू. स्वतःहून कुणीही Bet -365 वरती बेट लावायची नाही, असेही सांगण्यात आले होते.

नियंत्रण त्‍यांचेच, यांनी फक्‍त आशेने पाहायचे…
प्रत्येक बेटवर ॲपच्‍या भामट्या संचालकांचे नियंत्रण होते. ते रोज नफ्‍याची लालूच दाखवायचे आणि नुकसानीची भीती दाखवून मोठ्या रकमेचे रिचार्ज करून घ्यायचे. अशा पद्धतीने हा करोडोंचा घोटाळा आहे. राज्‍यातील असे अनेक जण फसवले गेले असू शकते. आता तर गणेशचे विन-की ॲपही बंद असून, ते लाॅगीन आयडी आणि पासवर्ड टाकूनही उघडत नाही.