जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन… ढग गडगडत असताना पडू शकते वीज, काळजी घ्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉन्सूनपूर्व पाऊस हा सोसाट्याच्या वाऱ्यासह तसेच विजेच्या गडगडाटासह पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यःस्थितीत मॉन्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून शेतकरी, शेतमजुर बांधवांनी याबाबत विशेष सतर्क राहावे. या कालावधीत वीज पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. त्यामुळे जिवीतहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मॉन्सूनपूर्व पाऊस हा सोसाट्याच्‍या वाऱ्यासह तसेच विजेच्या गडगडाटासह पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यःस्थि‍तीत मॉन्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून शेतकरी, शेतमजुर बांधवांनी याबाबत विशेष सतर्क राहावे. या कालावधीत वीज पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. त्‍यामुळे जिवीतहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

सतर्कतेची चिन्हे
अतिवेगाने वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.

… तर वीज पडू शकते
वीज ही सामान्यपणे उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्ष‍ि‍त नाही. परंतु काही स्थाने इतर ठि‍काणांपेक्षा सुरक्षित असतात. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षि‍त असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात.
वज्राघात होत असताना काय करावे
आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरिक्षण करावे. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थि‍तीत वैद्यकीय सेवेसंदर्भात व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशिल तयार करावे. जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेर, घराबाहेरील क्री‍या पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवण्यात यावे. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या तोडून टाकणे. परिसरात वादळी वारे गडगडाटी वारे, विजा चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. घरा भोवतालची उंच झाडे कुंपन यापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनीटे घराच्या आतच राहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षि‍त निवाऱ्याच्या ठिकाणाकडे प्रस्थान करावे. शेतीची अवजारे, मोटारसायकल व इतर वाहनांपासून दूर राहावे. गाडी चालवत असल्यास सुरक्ष‍ि‍तस्थळी जाण्याचा प्रयत्‍न करावा व गाडी सुरक्षि‍त ठिकाणी लावताना मोठ्या झाडापासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ठेवावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. मोकळ्यातसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहा. जंगलामध्ये दाट लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा.

वीज पडल्यास काय कराल…
त्वरित रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघातबाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही. श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरूत्थान प्रक्रिया (mouth to mouth) राबवावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करुन सुरू ठेवावी.

काय करू नये….
गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास वायरव्दारे जोडले गेलेले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रि‍क, इलेक्ट्रीकल उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका. गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विज चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे हे कार्य करू नये. प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा. (धातूची तारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग व प्लंबींग/नळ) घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळाव्दारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या वायर पासुन लांब रहा. विजा चमकत असतांना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी. जनावरांना सुरक्षि‍त स्थळी ठेवावे. घराबाहेर असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाजवळ उभे राहू नये. सुरक्षि‍त स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.