जिल्हाभर चोरट्यांचा धुमाकूळ; बुलडाणा, खामगाव, मलकापूर, लोणार, जानेफळात लाखोंची लुटालूट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभर चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बुलडाण्यात वकिलाच्या कार्यालयात ५ हजार रुपयांची, खामगाव तालुक्यातील हिंगणा उमरा येथे बागायती शेतकऱ्याच्या घरात सव्वादोन लाख रुपयांची, मलकापूर शहरात इलेक्ट्रॉनिक्स दुकानात २५ हजार रुपयांची, लोणार तालुक्यातील भानापूरच्या मराठी प्राथमिक शाळेत २६ हजार रुपयांची, जानेफळ येथील हार्डवेअरच्या दुकानात ६५ हजार रुपयांची, लोणारच्या रेडिमेड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभर चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बुलडाण्यात वकिलाच्‍या कार्यालयात ५ हजार रुपयांची, खामगाव तालुक्यातील हिंगणा उमरा येथे बागायती शेतकऱ्याच्‍या घरात सव्वादोन लाख रुपयांची, मलकापूर शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानात २५ हजार रुपयांची, लोणार तालुक्यातील भानापूरच्या मराठी प्राथमिक शाळेत २६ हजार रुपयांची, जानेफळ येथील हार्डवेअरच्या दुकानात ६५ हजार रुपयांची, लोणारच्या रेडिमेड दुकानात ८० हजार रुपयांचा लूट चोरट्यांनी केली आहे.

बुलडाण्यात वकिलाचे कार्यालय फोडले
बुलडाण्यातील वकील सतिश दिनकरराव रोठे यांचे जांभरून रोडवर राऊत कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. २६ जुलैला कार्यालय बंद करून ते बाहेरगावी गेले होते. ३१ जुलैच्या सायंकाळी परतले असता कार्यालयाचे शटर उघडे दिसले. कार्यालयातील स्टेशनरी साहित्य, रबरी शिक्के, अन्य महत्त्वाची कागदपत्रे, खरेदी खत, पेन ठेवण्याचे पितळी स्टँड असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात त्‍यांनी दिली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

खामगाव ः बागायती शेतकऱ्याचे घर फोडले
हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील शेतकरी गोपाळ श्रवण जमळे यांच्या घरात ३१ जुलैच्या रात्री घरफोडी झाली. घरातील सर्वजण दरवाजे बंद करून झोपले होते. १ ऑगस्टच्‍या पहाटे गोपाळ जुमळे यांच्या आईला जाग आली असता त्यांना घरातील सामान अस्‍तावस्त पडलेले दिसले व दरवाजे उघडलेले दिसले. त्यांनी घरातील इतर सदस्यांनाही उठवले. घरातील पेटीत ठेवलेले नगदी दोन लाख रुपये व दागिने असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल १ ऑगस्ट रोजी देण्यात आली.

मलकापुरात इलेक्‍ट्रॉनिकचे दुकान फोडले
मलकापूर येथील अतुल चंद्रकुमार चुगवानी यांच्या स्टेशन रोडवरील साईबाबा इलेक्‍ट्रॉनिकच्या दुकानात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी ३१ जुलै रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. ३१ जुलै रोजी सकाळी त्यांना दुकानाचे शटर तुटले असल्याची माहिती मिळाली. दुकानात जाऊन बघितले असता दुकानातील सामान अस्‍तावस्त पडलेले होते. दुकानातील वेगवेगळ्या कंपन्यांचे सिलिंग फॅन, इस्त्री असे विविध साहित्य किंमत २५ हजार ९०० रुपयांचे सामान चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली.

भानापूरच्या प्राथमिक शाळेवरही चोरट्यांनी वक्रदृष्टी
लोणार तालुक्यातील भानापूर येथेही शाळा फोडीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ३१ जुलैला शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग नालिंडे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या प्राथमिक शाळा बंद असल्याने फक्त ऑनलाइन शिक्षण सुरू असते.ऑनलाइन शिकवण्यासाठी शिक्षक रोज शाळेत येतात. ३१ जुलैला मुख्याध्यापक श्री. नालिंडे हे शाळेत आले असता त्यांना ऑफिस व वर्गखोल्यांचे लॉक तुटलेले दिसले. शाळेतील एलईडी टीव्ही, होम थिएटर, लाऊडस्पीकर, प्रोजेक्टर असे एकूण २५ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली.

जानेफळ येथे दोन दुकाने फोडली
जानेफळ येथील मेहकर रोडवरील दोन दुकाने फोडून गल्ल्यातील ६५ हजार रुपये लंपास केल्याची घटना आज, २ ऑगस्ट रोजी समोर आली. राजकुमार रामेश्वर लाहोटी यांचे मेहकर रोडवर हार्डवेअर दुकान आहे. दुकानाचे शटर गॅस कटरने तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील काऊंटर मधील ५० हजार रुपये लंपास केले. याच दुकानाच्या शेजारी असलेल्या हैनाही ट्रेडर्स या किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातून १५ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोणार शहरात रेडिमेड दुकान फोडले
लोणार शहरातील सराफा बाजारामधील संजय मनकचंद मुथा यांचे माऊली रेडिमेड दुकान ३१ जुलैच्या पहाटे चोरट्यांनी फोडले. दुकानाचा दरवाजा कटरने कापून दुकानातील रेडिमेड कपडे व गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण ८० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.