जिल्ह्यातील माजीमंत्र्यासह 6 नेत्यांची ती ठरणार सत्त्वपरीक्षा!

नगर पंचायतची निवडणूक ः फेब्रुवारी महिन्याअखेर निवडणुकीची दाट शक्यताबुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कधीचीच मुदत संपलेल्या मोताळा, संग्रामपूर नगरपंचायतींच्या निवडणूक मुहूर्ताची राजकारण्यांना आतुर प्रतीक्षा असताना अखेर पूर्व तयारीची सेमिफायनल समजले जाणारा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे याच महिन्याखेर वा मार्चच्या प्रारंभी फायनल अर्थात निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. …
 

नगर पंचायतची निवडणूक ः फेब्रुवारी महिन्याअखेर निवडणुकीची दाट शक्यता
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः
कधीचीच मुदत संपलेल्या मोताळा, संग्रामपूर नगरपंचायतींच्या निवडणूक मुहूर्ताची राजकारण्यांना आतुर प्रतीक्षा असताना अखेर पूर्व तयारीची सेमिफायनल समजले जाणारा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे याच महिन्याखेर वा मार्चच्या प्रारंभी फायनल अर्थात निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा कधी नव्हे एवढी चुरस राहण्याची चिन्हे असल्याने ही लढत अप्रत्यक्षपणे माजीमंत्र्यासह किमान 6 दिग्गज नेत्यांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमधेच मुदत संपलेल्या या नगर पंचायतींवर प्रशासक म्हणून मलकापूर व जळगाव जामोदच्या एसडीओंची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी सरत्या वर्षा अखेर निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात आली. प्रभाग रचना, सदस्य पदाचे आरक्षण, हरकतींवर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी, विभागीय आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे हे प्रशासकीय सोपस्कार ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्येच पार पडले. त्यानंतर मतदार यादी कार्यक्रमाची जानेवारीपासून प्रतीक्षा लागली. अखेर ग्रामपंचायत लढतीचा धुराळा खाली बसल्यावर कुठे हा कार्यक्रम लागला आहे. यानुसार 15 फेब्रुवारीला दोन्ही नगरपंचायतींची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यावर 22 फेब्रुवारीपर्यंत मतदारांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. ही बाब लक्षात घेता फेब्रुवारी अखेरीस वा मार्चच्या प्रारंभी लढतीच्या मुहूर्ताचा बिगुल वाजणार अशी दाट शक्यता आहे.
34 जागांसाठी रणधुमाळी
दरम्यान, दोन्ही पंचायतींच्या 17 जागा मिळून एकूण 34 जागांसाठी रणधुमाळी रंगणार आहे, आरक्षणामुळे काही इच्छुकांची गोची झाली असली तरी त्यावर उपाय शोधून सर्वच इच्छुक कधीचेच कामाला लागले आहेत. जागा 2 आकडी तर इच्छुक 3 आकडी असे चित्र आताच असल्याने संभाव्य चुरस स्पष्ट होते. यामुळे यंदाची लढत विद्यमान 34 तर भावी शेकडो सदस्यांची राजकीय परीक्षा ठरणार आहे. एवढेच नव्हे तर माजीमंत्री तथा आमदार संजय कुटे, त्यांचे पारंपरिक स्पर्धक प्रसेनजीत पाटील, रामविजय बुरुंगले, राजू भोंगळ, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्यासह दोन्ही ठिकाणी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीची देखील राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.