जिल्ह्यातील 10 हजार परीक्षार्थी संभ्रमात! कडक लॉकडाऊनमध्ये 11 एप्रिलला ‘एमपीएसी’ होणार?

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे तांडव रोखण्यासाठी राज्य शासनाने 4 एप्रिलला कडक लॉकडाऊन व विकेंडला दीर्घ कर्फ्यू लागू केला. यामुळे अलीकडे वादाचा आणि वादंगाचा विषय ठरणारी व येत्या रविवारी (11 एप्रिल)आयोजित एमपीएससीची परीक्षा होणार की नाही याबद्दल जिल्ह्यातील 10 हजारसह राज्यातील लाखो परिक्षार्थींमध्ये शंका निर्माण झाली आहे. यातच आयोगाकडून स्पष्ट खुलासा …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे तांडव रोखण्यासाठी राज्य शासनाने 4 एप्रिलला कडक लॉकडाऊन व विकेंडला दीर्घ कर्फ्यू लागू केला. यामुळे अलीकडे वादाचा  आणि वादंगाचा विषय ठरणारी व येत्या रविवारी (11 एप्रिल)आयोजित एमपीएससीची परीक्षा होणार की नाही याबद्दल जिल्ह्यातील 10 हजारसह राज्‍यातील लाखो परिक्षार्थींमध्ये शंका निर्माण झाली आहे. यातच आयोगाकडून स्पष्ट खुलासा करण्यात न आल्याने हा संभ्रम गडद झाला आहे. यामुळे राज्य शासनानेच  पुढाकार घेऊन  हा संभ्रम दूर करण्याची मागणी उमेदवारामधून होत आहे.

यापूर्वी मागील वेळा घेण्यात आलेली एमपीएससी परीक्षा वादंग व आंदोलनाचा विषय ठरली. 5 वेळा पुढे ढकलण्यात आलेली ही परिक्षा अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे सुरळीत पार पडली. मात्र यानंतर परीक्षेतील परिक्षार्थींची लक्षणीय गैरहजेरीने ही परीक्षा गाजली. बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 40 टक्के उमेदवारांनी दोन्ही पेपरला दांडी मारली! यामुळे तो खमंग चर्चेचा विषय ठरला. या पार्श्वभूमीवर येत्या 11 एप्रिल रोजी अर्थात रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान आयोजित करण्यात अली आहे. ब्रेकिंग द चेन अंतर्गत शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेदरम्यान कडक कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. कोरोनाचा भीषण प्रकोप रोखण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे. यामुळे ही परीक्षा पार पडणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात  9600 परिक्षार्थींनी नोंद केली आहे. याची जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र आयोगाकडून नेमके स्पष्टीकरण करण्यात न आल्याने व आयोगाकडे यंत्रणांनी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. यामुळे आयोजक महसूल यंत्रणांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.