जिल्ह्यातील 1419 गावांना मिळणार विविध सवलती; विद्यार्थ्यांचे शुल्क माफ, लाखो शेतकर्‍यांना दिलासा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 1419 गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ओल्या दुष्काळावर शिक्कामोर्तब झालेल्या जिल्ह्याला प्राथमिक टप्प्यात विविध सवलती देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांची अंतिम पैसेवारी 37 ते 48 पैसे दरम्यान आली आहे. सरासरी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 1419 गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ओल्या दुष्काळावर शिक्कामोर्तब झालेल्या जिल्ह्याला प्राथमिक टप्प्यात विविध सवलती देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांची अंतिम पैसेवारी 37 ते 48 पैसे दरम्यान आली आहे. सरासरी 46 इतकी आल्याने खरीप हंगामाची भीषण अवस्था अधोरेखित झाली आहे. नियमानुसार या 1419 गावांना विविध सवलती देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लाखो शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट मिळणार आहे. हा आकडाच लाखोंमध्ये जात असल्याने लाखांवर विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय शेतकर्‍यांना जमीन महसूल माफ, त्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्घटन, शेती निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच त्यांची कृषी पंपाची वीज जोडणी (कनेक्शन) खंडित करू नये, असे निर्देश देण्यात येणार आहेत. याशिवाय रोजगार हमी योजनेच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.