जिल्ह्यातून सरकारी तिजोरीत 56 कोटींची गंगाजळी!; कोरोना प्रकोप, निवडणुकांच्या धामधुमीतही ‘महसूल’ची कामगिरी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू आर्थिक वर्षात असलेला कोरोनाचा प्रकोप , निवडणुकांची धामधूम, कर्मचाऱ्यांची कमतरता या व अनेक अडचणींवर मात करीत महसूल विभाग व खनिकर्म विभागाने मार्च मध्यावर तब्बल 65 कोटींची गौण खनिज रॉयल्टीची वसुली करण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. यावरच ना थांबता उर्वरित कालावधीत 100 टक्के वसुलीचा निर्धारही महसूल यंत्रणांनी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालू आर्थिक वर्षात असलेला कोरोनाचा प्रकोप , निवडणुकांची धामधूम, कर्मचाऱ्यांची कमतरता या व अनेक अडचणींवर मात करीत महसूल विभाग व खनिकर्म विभागाने मार्च मध्यावर तब्बल 65 कोटींची गौण खनिज रॉयल्टीची वसुली करण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. यावरच ना थांबता उर्वरित कालावधीत 100 टक्के वसुलीचा निर्धारही महसूल यंत्रणांनी केला आहे.

कोरोनाविरुद्धच्या अविरत लढाईवर शासनाचा मोठा निधी खर्च होत आहे. यामुळे शासकीय तिजोरीत खणखणाट निर्माण झाला आहे. या परिस्थितीत या तिजोरीत लक्षणीय भर घालण्याची जबाबदारी महसूल यंत्रणांनी उचलली आहे. यंदा जिल्ह्याला गौण खनिज स्वामीत्वधन (रॉयल्टी) पोटी 93 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. राठोड, 6 एसडीओ यांच्या मार्गदर्शनात सुसज्ज नियोजन करण्यात आले. 13 तहसीलदार व अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी 1 एप्रिल ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान 53 कोटी 25 लाख 90 हजार रुपये इतकी रॉयल्टी विविध यंत्रणांकडून वसूल केली. 1 ते 15 मार्च दरम्यान 11 कोटी 83 लाख इतकी वसुली करण्यात आली. यामुळे आज अखेरीस 70 टक्के म्हणजे 65 कोटी 8 लाख 40 हजार रॉयल्टीपोटी वसूल करण्यात आले. नुकत्‍याच पार पडलेल्या रेतीघाटाच्या लिलावातून मिळालेल्या 5 कोटी 23 लाख रुपयांमुळे यात भर पडली असल्याचे ‘खनिकर्म’चे संजय वानखेडे यांनी सांगितले.