जिल्ह्यात कोरोनामुळे 18 बालकांनी गमावले पालक!; कृती दलाकडून प्राथमिक चौकशी सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोना महामारीच्या काळात पालक गमावलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा विक्रीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत असल्याने अलर्ट झालेल्या जिल्हा कृती दलाने अशा बालकांचा जिल्ह्यात शोध सुरू केला आहे. सध्या अशी 18 बालके समोर आली असून, यातील 4 बालकांचे दोन्ही पालक हयात नाहीत. यात दोन मुली आणि दोन मुले आहेत. दत्तक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोना महामारीच्या काळात पालक गमावलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा विक्रीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत असल्याने अलर्ट झालेल्या जिल्हा कृती दलाने अशा बालकांचा जिल्ह्यात शोध सुरू केला आहे. सध्या अशी 18 बालके समोर आली असून, यातील 4 बालकांचे दोन्ही पालक हयात नाहीत. यात दोन मुली आणि दोन मुले आहेत.

दत्तक घेण्याची सरकारी प्रक्रिया असते. कुणी परस्पर कुणालाही दत्तक घेऊ शकत नाही. अशा प्रकारांमध्ये काही दृष्टप्रवृत्ती असू शकतात. त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मुलांना कायदेशीर मदत कशी करता येते ? जिल्हास्तरावर शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याही बालकांना मदतीची गरज आहे त्यांनी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत घोषित करण्यात आलेल्या मदत क्रमांकावर संपर्क करावा. कोरोना काळात जिल्हा कृती दलामार्फत एकूण १८ बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. ज्यात ४ बालकांना दोन्ही पालक नाहीत. यामध्ये २ मुली व २ मुले आणि १४ बालके ही कोरोनामुळे एक पालक झालेली आढळलेली आहेत. यात ८ मुली व ६ मुले आढळली आहेत. या बालकांची प्राथमिक चौकशी सुरू असून, त्यांना बाल कल्याण समिती मार्फत पुढील पुनर्वसनासाठी हजर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे नातेवाहिक आणि पालक यांच्या रोजगार आणि व्यवसाय सुरळीत सुरू नसल्याने या बालकांना शिक्षण आणि उपजीविकेसाठी आर्थिक मदत लागणार असल्याचे कळाले आहे.

ज्या व्यक्ती व सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था आहेत, ज्यांना अशा बालकांना मदत करायची आहे त्यांनी बालकांना परस्पर मदत न देता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून अशा व्यक्ती किंवा संस्थांना बाल न्याय अधिनियमातील तरतुदीनुसार योग्य व्यक्ती किंवा संस्था म्हणून घोषित करण्यात येईल. संकटग्रस्त अशा बालकांची निवास गरजा, शिक्षण आणि मुलभूत गरजा व संपत्तीचे अधिकार आणि सर्वांगीण काळजी आणि संरक्षणासाठीची व्यवस्था बाल कल्याण समितीमार्फत होत असल्याने बालकांना परस्पर ताब्यात न घेता, त्याला बाल कल्याण समितीमार्फत पुनर्वसन सेवा देण्याचे आवाहन जिल्हा कृती दल आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

बालकांसाठी मदत क्रमांक

  • चाईल्ड लाईन टोल फ्री.1098
  • महिला व बाल विकास विभाग मदत संपर्क क्रमांक – 8308992222/74०००15518
  • बाल कल्याण समिती बुलडाणा संपर्क क्रमांक – 8380940778/8805520308/9423748019/9421657145
  • बालगृह संपर्क क्रमांक – 9960338000
  • शिशुगृह संपर्क क्रमांक – 9422881932/7498543635
  • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संपर्क क्रमांक – 8975600631
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बुलडाणा – 9421566834