जिल्ह्यात गर्भपाताच्‍या औषधी विक्रीचे रॅकेट? बुलडाण्यात मनिष मेडिकलच्‍या गैरधंद्याचा असा झाला पर्दाफाश!; गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. यामागे गर्भपात औषधीची राजरोस विनापरवाना होणारी विक्री तर कारणीभूत नाही ना, असा संशय निर्माण व्हायला जागा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने बनावट ग्राहक पाठवून बुलडाण्यातील जांभरूण रोडवरील मनिष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्सच्या गैरधंद्याचा पर्दाफाश केला. मात्र या मेडिकलकडे ही औषध कशी आणि कुठून आली, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुलींचा जन्‍मदर कमी आहे. यामागे गर्भपात औषधीची राजरोस विनापरवाना होणारी विक्री तर कारणीभूत नाही ना, असा संशय निर्माण व्हायला जागा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने बनावट ग्राहक पाठवून बुलडाण्यातील जांभरूण रोडवरील मनिष मेडिकल ॲन्‍ड जनरल स्‍टोअर्सच्या गैरधंद्याचा पर्दाफाश केला. मात्र या मेडिकलकडे ही औषध कशी आणि कुठून आली, ही औषधी विनापरवाना विकणारे रॅकेट तर सक्रीय ना, याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मेडिकलचालकासह दोघांविरुद्ध या औषधीची अवैधरित्‍या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आज, १५ जुलैला गुन्‍हा दाखल केला आहे.

या प्रकरणात अन्न आैषध प्रशासन विभागाचे आैषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून मेडिकलचा मालक नीलेश मधुकर इंगळे (२३, रा. चिखला, पो. हातणी ता. चिखली) आणि योगेश सुधाकर गायवाड (२७, रा. चौथा, पो. पाडळी ता. बुलडाणा) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. मुठ्ठे ले आऊटमध्ये हे मेडिकल स्‍टोअर आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या अशा प्रकारच्‍या औषधींच्या खरेदी-विक्रीची तपासणी जिल्हाभर सुरू आहे. दुकानांच्या तपासण्या करणे, औषध विषयक शोध घेणे, विक्रीसाठी ठेवलेल्या आैषधांचे नमुने घेऊन विश्लेषणाकरिता पाठविणे, जप्ती करणे, अभिलेखा पडताळणी करणे व आक्षेपार्ह आढळल्यास त्यानुसार संबंधितांविरुध्द कारवाई केली जात आहे. १२ जुलैला मे. मनिष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्सवर एमटीपी किटची (गर्भपातासाठीची औषधी) अवैधरीत्या खरेदी करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्‍यामुळे सहायक आयुक्त अशोक तुकाराम बर्डे व आैषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके पंचांना सोबत या दुकानात तपासणीला गेले. त्‍याआधी खात्री करण्यासाठी त्‍यांनी बनावट ग्रहाकाला मेडिकलवर गर्भपाताची आैषधे घेण्यासाठी २ हजार रुपयांची नोट देऊन पाठवले. दुपारी सव्वा चारला हा बनावट ग्राहक मनिष मेडिकलवर गेला. मेडिकल मालकाने गर्भपातासाठी लागणारी (Gestepro Kit) ज्याची किंमत ४२५ रुपये आहे ती बनावट ग्राहकाला तब्‍बल २ हजार रुपयांना विक्री केली. या बनावट ग्राहकाने इशारा करताच अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्‍या पथकाने मेडिकलवर छापा मारला. मेडिकल मालकाला आैषधीबाबत पथकाने विचारणा केली असता ही आैषधी योगेश मधुकर गायकवाड याच्‍याकडून मिळवल्याचे सांगितले. योगेश गायकवाड तिथेच दुकानात उभा होता. त्याच्‍याकडील बॅगची झडती घेतली त्‍यातही ही औषध आढळली. एकूण सहा किट ताब्‍यात घेण्यात आल्या. यातील ५ एमटीपी कीट जप्‍त करून १ कीट अनौपचारीक नमुना तपासणीसाठी घेण्यात आली आहे.

तपासणी करताना या औषधीच्‍या विक्री बिलाची मागणी पथकाने मेडिकल मालकाकडे केली. मात्र नीलेश इंगळे व योगेश गायकवाडला ही बिले किंवा कोणतीही कागदपत्रे दाखवता आली नाहीत. योगेश चांदा (चांडोळ, ता. बुलडाणा) यांच्‍याकडून औषधी खरेदी केल्याचे योगेश गायकवाडने सांगितले. मात्र त्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. या दोघांनी अवैधरित्या एमटीपी कीटची खरेदी- विक्री करून लोकांच्या स्वास्थाशी खेळण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाची व जनतेची फसवणूक केली. त्‍यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय श्री. आहिरराव करत आहेत.