जिल्ह्यात घाटावर जोरदार; नदीनाल्यांना पूर; घाटाखाली रूसवा कायम!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात घाटावर जोरदार पुनरागमन केले आहे. काल, १५ जुलैच्या संध्याकाळी आणि रात्रीतून घाटावर धो धो पाऊस बरसला. घाटावरील सहाही तालुक्यांत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. घाटाखालील खामगाव वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा रूसवा कायम आहे. अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मेहकर तालुक्यात आतापर्यंत यावर्षी सर्वाधिक पाऊस …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात घाटावर जोरदार पुनरागमन केले आहे. काल, १५ जुलैच्या संध्याकाळी आणि रात्रीतून घाटावर धो धो पाऊस बरसला. घाटावरील सहाही तालुक्यांत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. घाटाखालील खामगाव वगळता इतर सहा तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा रूसवा कायम आहे. अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मेहकर तालुक्यात आतापर्यंत यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला, तर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात अजूनही धोंडी धोंडी पाणी देचा गजर सुरूच आहे.

आज सकाळी १० पर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार घाटावरील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आला. मेहकर तालुक्यातील भोगावती नदीला काल सायंकाळी पूर आल्याने साखरखेर्डा आणि लव्हाळा रस्त्यावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. भोगावती नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पूर आला. मेरा बुद्रूक येथे झालेल्या पावसाचे पाणी अनेकांच्‍या घरात शिरले. चिखली तालुक्यातील अंचरवाडी, शेळगाव आटोळ, भरोसा या परिसरात जोरदार पाऊस झाला. अंचरवाडी येथे घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले. सिंदखेड राजा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जोरदार पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. मेहकर तालुक्यात नेहमीप्रमाणे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.

घाटाखाली अजूनही प्रतीक्षा
घाटावर यंदा पर्जन्यमान चांगले असले तरी घाटाखाली मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. घाटाखालील खामगाव तालुका वगळता इतर सहा तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने बळीराजा अडचणीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेतलाय.

असा झाला आतापर्यंतचा पाऊस

  • मेहकर : ४४५.४ मि. मी.
  • सिंदखेड राजा : ४०८.३ मि. मी.
  • चिखली : ३५३.८ मि. मी.
  • लोणार : ३३७.१ मि. मी.
  • खामगाव : २८६.७ मि. मी.
  • देऊळगाव राजा : २६६.२ मि. मी.
  • बुलडाणा : २४३.९ मि. मी.
  • संग्रामपूर : १९८.७ मि. मी.
  • मोताळा : १९१.४ मि. मी.
  • नांदुरा : १७६.९ मि. मी.
  • मलकापूर : १३८. ८ मि. मी.
  • जळगाव जामोद : ८८.७ मि. मी.
  • शेगाव : ८६.० मि. मी.