जिल्ह्यात दोन भीषण अपघातात 3 ठार, 4 गंभीर जखमी; लोणार अन् नांदुरा तालुक्यातील दुर्घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दोन भीषण अपघातांत 3 जण ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटना लोणार आणि नांदुरा तालुक्यातील आहेत.बीबीजवळ भीषण अपघातात दोन जण ठार लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई- नागपूर महामार्गावर आज, 12 फेब्रुवारीला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान नॅनो कार आणि मोटरसायकलमध्ये भीषण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दोन भीषण अपघातांत 3 जण ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटना लोणार आणि नांदुरा तालुक्यातील आहेत.
बीबीजवळ भीषण अपघातात दोन जण ठार


लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई- नागपूर महामार्गावर आज, 12 फेब्रुवारीला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान नॅनो कार आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला. त्यात दोन जण जागीच ठार झाले. मोटारसायकलवरील मनप्रीत सिंग तेजिंदर सिंग नांगर जागीच ठार झाले आणि नॅनो कारमधील अक्षय राऊत राऊत उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत झाले. कारमधील राऊत यांची पत्नी निकिता आणि लहान मुलगा गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढे जालन्याला हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. तपास बीबी पोलीस करत आहेत.
नांदुर्‍यात कार-ट्रकची धडक, 1 ठार
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने समोरून येणार्‍या कारला जोरदार धडक दिली. यात कारचालक नीलेश साहेबराव दामोधर (26, रा. कृष्णानगर नांदुरा) ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल, 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता नांदुरा- मलकापूर रोडवरील 105 फुटी हनुमान मूर्तीसमोर घडली.


नांदुरा येथील नीलेश दामोधर आपल्या मित्रांसह एमएच 12 एक्स 7050 या क्रमांकाच्या कारने मलकापूरकडून नांदुराकडे येत होते. हनुमान मूर्ती जवळ समोरून येणार्‍या यू पी 83 एटी 7521 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारचालक नीलेश दामोधर व त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. स्थानिकानी जखमींना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना खामगाव येथे हलविण्यात आले. परंतु रस्त्यातच नीलेश दामोधर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन मित्रांवर खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक नीलेश यांच्या पश्‍चात आई व दोन भाऊ आहेत. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.