जिल्ह्यात पुन्‍हा निर्बंध… २८ जूनपासून दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच!; कृषी केंद्र सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर बुलडाणा जिल्ह्याला मिळालेले ‘स्वातंत्र्य’ अवघ्या 14 दिवसांचे ठरले! कोरोनाच्या वाढत्या व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्याची पुन्हा 3 लेव्हलमध्ये रवानगी झालीय!! यामुळे आता पुन्हा व्यापार क्षेत्र 28 जूनपासून मर्यादित वेळात सुरू राहणार आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, त्याचा बालकांना असलेला धोका व डेल्टा प्लस या नवीन विषाणूचा वाढता धोका …
 
जिल्ह्यात पुन्‍हा निर्बंध… २८ जूनपासून दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच!; कृषी केंद्र सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर बुलडाणा जिल्ह्याला मिळालेले ‘स्वातंत्र्य’ अवघ्या 14 दिवसांचे ठरले! कोरोनाच्या वाढत्या व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्याची पुन्हा 3 लेव्हलमध्ये रवानगी झालीय!! यामुळे आता पुन्हा व्यापार क्षेत्र 28 जूनपासून मर्यादित वेळात सुरू राहणार आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, त्याचा बालकांना असलेला धोका व डेल्टा प्लस या नवीन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता शासनाने नव्याने निर्देश दिले. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज या संदर्भातील आदेश जारी केले असून, त्याची अंमलबजावणी 28 जूनपासून होणार आहे. यामुळे जेमतेम 14 दिवस सुरू असलेली मॉल, नाट्यगृह, सिनेमागृहांची दारे पुन्हा सिल होणार आहेत. या व्यवसायासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र जिम, सलून, पार्लर याना धक्का न लावता त्यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह व्यवसायाची सवलत देण्यात आली. खरीप हंगाम लक्षात घेता, कृषी सेवाकेंद्र, कृषी संबंधित सेवा यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी मुभा देण्यात आली आहे. डेअरी सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 4 व संध्याकाळी 6 ते 8 अशी 2 टप्प्यात राहणार आहे.

नव्या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पॉल्ट्री, मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, ५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र रोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. दुग्‍धालय, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण व्‍यवस्‍था सकाळी ७ ते ४ या वेळेत खुली राहतीलच, पण सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंतही त्‍यांना मुभा देण्यात आली आहे.

  • सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णतः बंद राहतील.
  • कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने व कृषी विषयक सेवा यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार तसेच अन्य दिवशी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील.
  • सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी असेल.
  • सर्व प्रकारची खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.
  • सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.
  • रोज सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत खेळांना परवानगी असेल.
  • सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत, ५० टक्के क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल.
  • सर्व केशकर्तनालये, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणीसह सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही.
  • लग्न समारंभ बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला 20 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल.
  • सभा, बैठका, निवडणुका आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील.
  • बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी 4 वाजेपर्यंत काम करतील.
  • ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमांचे पालन करून नियमितपणे सुरू राहतील.
  • सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील. मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील.
  • आंतर जिल्हा प्रवास वाहतूक, खासगी बस, टॅक्‍सी, बसेस, लांब पल्ल्याची रेल्‍वे वाहतूक नियमितपणे पूर्णवेळ, परंतु स्तर 5 मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील.

सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरू राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्था, खासगी व शासकीय बँका, विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या, नॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी 5 नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिक, आस्थापना, दुकाने यांनी मास्क असणे, हात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था, संघटना यांच्‍यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.