जिल्ह्यात बियाणे, खतांचा तुटवडा नाही!; कृषी उपसंचालक विजय बेतीवार यांचा Buldana Live कडे निर्वाळा; शेतकऱ्यांना केले “या’ विषयावर सावध!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा जिल्ह्याकडे आहे. जिल्ह्यात कुठेही बियाणे आणि खतांचा तुटवडा नसल्याची माहिती कृषी उपसंचालक विजय बेतीवार यांनी “बुलडाणा लाइव्ह’ला दिली. तुटवडा दाखवुन लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकांची तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील पेरणीयोग्य क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून …
 
जिल्ह्यात बियाणे, खतांचा तुटवडा नाही!; कृषी उपसंचालक विजय बेतीवार यांचा Buldana Live कडे निर्वाळा; शेतकऱ्यांना केले “या’ विषयावर सावध!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा जिल्ह्याकडे आहे. जिल्ह्यात कुठेही बियाणे आणि खतांचा तुटवडा नसल्याची माहिती कृषी उपसंचालक विजय बेतीवार यांनी “बुलडाणा लाइव्ह’ला दिली. तुटवडा दाखवुन लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकांची तक्रार करा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

जिल्ह्यातील पेरणीयोग्य क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढल्‍याचे ते म्‍हणाले. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात यावर्षी पेरणीसाठी सोयाबीनचे 2 लाख 88 हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याकडे त्यांचे स्वतःचे घरचे बियाणे आहे. त्या बियाण्यावर प्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कृषी केंद्र चालकांकडून पक्के बिल घ्या; बिलावर सही करा…
शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बियाणे आणि खते खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. कागदी बिल घेऊ नये. बिलावर सही करावी. छापील किमतीपेक्षा अधिक दरात कुणी बियाणे आणि खते विकत असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार द्यावी, असेही कृषी उपसंचालकांनी सांगितले.

वर्षभरात 3000 तक्रारी प्राप्त
वर्षभरात जिल्हा कृषी विभागाकडे 3000 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पैकी 1600 तक्रारी सदोष आढळल्या. ज्यांच्याविरोधात सदोष तक्रारी आढळल्या त्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. काही कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्यामुळे अशा कंपन्‍यांवर वरिष्ठ स्‍तरावरून कारवाई करण्यात आली, असे श्री. बेतीवार म्‍हणाले.

खरीप तयारी पूर्ण…
जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्ण तयारी कृषी विभागाने केली आहे. यावर्षी जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी सर्वाधिक 3 लाख 84 हजार 955 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ कापूस 1 लाख 98 हजार 647 हेक्टर, 74 हजार 126 हेक्टर तूर, 28 हजार 502 हेक्टर मका, 10 हजार 35 हेक्टर ज्वारी, 20 हजार 262 हेक्टर उडीद, 18 हजार 874 हेक्टर मूग या पिकांची पेरणी होणार आहे.