जिल्ह्यात महिनाभरात आढळले 6 अनोळखी मृतदेह!; काहींचा भुकेने तडफडून मृत्‍यू?

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे ओळखीच्या लोकांना लोक जवळ येऊ देईनात तिथे अनोळखींना जवळ येऊ देणे दूरचीच गोष्ट. एरव्ही भिकाऱ्यांना जेवणासाठी पोळी, भाजी देणारे हात पुढे यायचे. कोरोना संकटाने भिकाऱ्यांना लोक जवळही फिरकू देईनात झाले. परिणाम जिल्ह्यात अनेक भिकाऱ्यांचा भुकूने तडफडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्‍यामुळे ओळखीच्‍या लोकांना लोक जवळ येऊ देईनात तिथे अनोळखींना जवळ येऊ देणे दूरचीच गोष्ट. एरव्‍ही भिकाऱ्यांना जेवणासाठी पोळी, भाजी देणारे हात पुढे यायचे. कोरोना संकटाने भिकाऱ्यांना लोक जवळही फिरकू देईनात झाले. परिणाम जिल्ह्यात अनेक भिकाऱ्यांचा भुकूने तडफडून मृत्‍यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 6 अनोळखी मृतदेह आढळले असून, त्‍यांची आजवर ओळख पटलेली नाही. यातील बहुतांश जण रस्‍त्‍याने भटकत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 एप्रिलला एक मृतदेह आढळला. याच दिवशी खामगाव येथील नांदुरा रस्‍त्‍यावरील स्‍वामी समर्थ कॉम्‍प्‍लेक्‍सजवळ एक मृतदेह आढळला. शेगाव शहरात महिनाभरात तब्‍बल 3 मृतदेह आढळले असून, यातील एक रेल्‍वे स्‍टेशन चौकासमोरील रस्‍त्‍याच्‍या कडेला फूटपाथवर 14 एप्रिलला, दुसरा बसस्‍थानकासमोर 13 एप्रिलला आणि तिसरा मृतदेह सईबाई मोटे रुग्‍णालयाजवळ 4 एप्रिलला आढळला आहे. याशिवाय शेगाव-खामगाव रोडवरील सवर्णा (ता.शेगाव) शिवारात 13 एप्रिलला एक मृतदेह आढळला आहे.

महिनाभरातील हे सर्व मृत्‍यू अनैसर्गिक झाल्‍याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्‍या मंदिरामुळे अनेक भिकारी वास्‍तव्‍यास आहेत. यातील काही मनोरुग्‍णही आहेत. त्‍यांना जेवणाबद्दल कुणाला काही मागताही येत नाही. यात लॉकडाऊनमुळे त्‍यांना कुणी जेवायलाही देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेगावमधील बळी हे भुकेने गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.