जिल्ह्यात मृत्‍यूचे थैमान… कोरोनामुळे 24 तासांत 8 बळी!; 1003 नव्‍या रुग्‍णांची भर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कधीकाळी सर्वसामान्यांचा एन्जॉय डे असलेला व आता कोरोनाच्या सावटाखाली कधी येतो अन् कधी जातो अशी गत झालेल्या रविवारीदेखील चार आकडी कोरोना पॉझिटिव्हची मालिका कायम राहिली! आज, 2 मे रोजी 1003 रुग्णांचा अहवाल आला असून मेहकर विधानसभा मतदारसंघासह बुलडाणा तालुक्यातील कोविडचा हैदोस कायम असल्याचे धोकादायक चित्र आहे. दुसरीकडे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कधीकाळी सर्वसामान्यांचा एन्जॉय डे असलेला व आता कोरोनाच्या सावटाखाली कधी येतो अन्‌ कधी जातो अशी गत झालेल्या रविवारीदेखील चार आकडी कोरोना पॉझिटिव्हची मालिका कायम राहिली! आज, 2 मे रोजी 1003 रुग्णांचा अहवाल आला असून  मेहकर विधानसभा मतदारसंघासह बुलडाणा तालुक्यातील कोविडचा हैदोस कायम असल्याचे धोकादायक चित्र आहे. दुसरीकडे मृत्यूचे थैमान देखील सुरूच असल्याने आरोग्य यंत्रणा घायकुतीला आल्या आहेत.

मेहकर आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून, गत 24 तासांत तालुक्यात तब्बल 173 रुग्ण आढळले आहेत. लोणारदेखील मागे नसून तालुक्यात 131 पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मेहकर मतदारसंघातच बाधितांचा आकडा तीनशेच्या पार (304) गेलाय! खामगाव 80, शेगाव 60, नांदुरा 92, जळगाव जामोद 81, सिंदखेडराजा 79, या तालुक्यातील कोरोनाचे आकडे धडकी भरविणारे ठरावेत असेच आहेत. या तुलनेत देऊळगाव राजा 21, चिखली 36, मलकापूर 18, संग्रामपूर 26 येथील रुग्णसंख्या आज तरी आटोक्यात आहे.

मृत्यूचे तांडव

दरम्यान, गत 24 तासांत कोरोना बळींचे थैमान कायम असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.  मृत्यूचा 8 चा आकडाच पुरेसा बोलका व अबोल, सुन्‍न करणारा ठरावा! खामगाव सामान्य रुग्णलयातील 5 रुग्ण दगावले. उपचारादरम्यान दुर्गापुरा, देऊळगाव राजा येथील 21 वर्षीय पुरुष, जानेफळ ता. मेहकर येथील 46 वर्षीय पुरुष, खंडाळा ता. मेहकर येथील 66 वर्षीय पुरुष, सज्जनपुरी खामगाव येथील 75 व 60 वर्षीय पुरुष, खामगाव येथील 65 वर्षीय पुरुष व 82 वर्षीय महिला, तिवडी ता. जळगाव जामोद येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बळींची संख्या 419 पर्यंत पोहोचली!

6933 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 1143 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  आजपर्यंत 363212 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 58630 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5878 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 65982 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 6933 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 419 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.