जिल्ह्यात लाखावर शेतकरी पीककर्जाच्‍या प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्‍या आदेशाला बँका जुमानेनात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ३२ हजार १७९ शेतकऱ्यांना २९० ४४ लाख रुपयांचेच वितरण झाले आहे. १ लाख ७ हजार ८२१ शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. हे कर्ज मिळणार कधी, पेरण्या करायच्या कधी, या विवंचनेत हे शेतकरी …
 
जिल्ह्यात लाखावर शेतकरी पीककर्जाच्‍या प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्‍या आदेशाला बँका जुमानेनात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ३२ हजार १७९ शेतकऱ्यांना २९० ४४ लाख रुपयांचेच वितरण झाले आहे. १ लाख ७ हजार ८२१ शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. हे कर्ज मिळणार कधी, पेरण्या करायच्या कधी, या विवंचनेत हे शेतकरी आहेत. अनेकांनी कर्जाचे पुनर्गठण न केल्याने त्‍यांना पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे, तर काहींनी कागदपत्रे बँकेत जमा केलेली नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्ण कागदपत्रे जमा करूनही बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकांची हीच आडमुठी भूमिका कायम राहिल्यास जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचे प्रमाण पुन्‍हा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेऊन पीक कर्ज तातडीने वाटप करण्याच्‍या सूचना केल्या होत्‍या. मात्र त्‍यांच्‍या आदेशालाही बँकांनी वाटाण्याच्‍या अक्षता लावल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्‍य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्‍मान योजनेतून दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला बँकांनी अनेक शेतकऱ्यांच्‍या बाबतीत केराची टोपली दाखवली आहे. त्‍यामुळे हजारो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, परिणामी पीककर्जापासूनही ते वंचित राहून सावकाराच्‍या दावणीला बांधले जाणार आहेत. ज्‍यांचे कर्ज माफ झाले त्‍यांचे कर्ज पुनर्गठण करून देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत.

शेतीमशागतीची कामे आटोपली…
सध्या शेती मशागतीची कामे आटोपली असून, पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्यांच्‍या खिशात पैसेच नाहीत. बियाणे, खते खरेसाठी पैसे हवे असल्याने बँकांच्‍या चकरा मारणे सुरू आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्‍ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकरी बांधवांनो, तूर्त पेरण्या नकोच!
पाऊस लांबणार असल्याने पेरण्या थांबविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सोयाबीन बियाणे सध्या बाजारात हव्या त्‍या कंपन्यांचे उपलब्‍ध नाही. त्‍यात बियाणाचे दर वाढले आहेत. त्‍यातच २१-२२ जूनपर्यंत पाऊस लांबल्याने संभाव्‍य नुकसान टाळण्यासाठी प्रामुख्याने सोयाबीनचा पेरा थांबविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी घाई केली तर वाढत्‍या तापमानामुळे बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे खामगावचे उपविभागीय कृषी अधिकारी दीपक पटेल यांनी म्‍हटले आहे.