जिल्ह्यात 110 मि.मी. पाऊस!; टिनाने कटून बैलाचा तर वीज पडून गाई, म्हशीचा मृत्यू, वादळाने घरांचे नुकसान, येळगावात तेराशे कोंबड्या दगावल्या!

बुलडाणा( विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 30 मे रोजी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान विविध दुर्घटनांत 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळाने घरांचे नुकसान झाले असून, येळगावमध्ये पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त होऊन 1320 कोंबड्या दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 28 मे रोजी जिल्ह्यात अनेक …
 

बुलडाणा( विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 30 मे रोजी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान विविध दुर्घटनांत 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळाने घरांचे नुकसान झाले असून, येळगावमध्ये पोल्‍ट्री फार्म उद्‌ध्वस्‍त होऊन 1320 कोंबड्या दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

28 मे रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह संमिश्र पावसाने हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील 15 घरांवरील टिनपत्रे उडून नुकसान झाले. तसेच उडालेल्या एका टिनाने कटून एक बैल दगावला. याच तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील वर्षा भोपळे यांच्या रेशन दुकानावरील टिनपत्रे उडाली. यामुळे 3 पोते गहू व तांदूळ भिजल्याने नुकसान झाले. चिखली तालुक्यातील दिवठाणा व बोरगाव येथे वीज पडून गाई व म्हैस दगावली. येळगाव (ता. बुलडाणा) येथील ब्रह्मानंद गडाख यांचे पोल्‍ट्री फार्म पाऊस आणि वादळाने उद्‌ध्वस्‍त झाले. यात गावरान 1500 कोंबड्यांपैकी 1320 कोंबड्या दगावल्याने त्‍यांचे 2 लाखांच्‍यावर नुकसान झाले आहे. त्‍यांची उपजिवीका या व्‍यवसायावरच होती. तोच निसर्गाने हिरावला आहे. ग्रामसेवक श्री. पायघन आणि तलाठी अतुल झगरे यांनी आज सकाळी भेट देऊन पंचनामा केला. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गडाख यांनी केली आहे.

बुलडाण्यात सर्वाधिक पाऊस
दरम्यान, बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 25. 8 मि.मी. पावसाने हजेरी लावली. याशिवाय चिखली 9.7 मि.मी., सिंदखेडराजा 12.4, देऊळगाव राजा 8.6 मि.मी., मेहकर 17.7 मि.मी., शेगाव 3.4 मि.मी., मलकापूर 15.9 मि.मी., नांदुरा 4.8, मोताळा 9 मि.मी., जळगाव जामोद 1.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. संग्रामपूर वगळता 12 तालुक्यांत एकूण 110 मिलिमीटर पावसाने हजेरी लावली.