जोडपं ‘सैराट’ झालं… पलढग कोथळीत सिनेस्‍टाइल राडा!; ‘त्‍याच्‍या’ मित्राच्‍या घरावर मोठ्या जमावाचा हल्ला!!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझ्या समाजातील पोराने आमच्या समाजातील पोरगी पळवून नेली आहे. त्याला तू मदत केली आहे. दोघे कुठे आहेत सांग, असे विचारत 30 ते 40 जणांच्या जमावाने एका तरुणावर घरात घुसून जीवघेणा हल्ला चढवला. घरातून बाहेर काढून मारत मारत बसस्थानकावर नेले. या तरुणाच्या घरच्यांनाही बेदम मारहाण केली. लाठ्या-काठ्या, फायटरने तरुणाला झोडपले जात …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्या समाजातील पोराने आमच्‍या समाजातील पोरगी पळवून नेली आहे. त्‍याला तू मदत केली आहे. दोघे कुठे आहेत सांग, असे विचारत 30  ते 40 जणांच्‍या जमावाने एका तरुणावर घरात घुसून जीवघेणा हल्ला चढवला. घरातून बाहेर काढून मारत मारत बसस्‍थानकावर नेले. या तरुणाच्‍या घरच्‍यांनाही बेदम मारहाण केली. लाठ्या-काठ्या, फायटरने तरुणाला झोडपले जात असताना त्‍याच समाजाच्‍या एकाने या तरुणाला त्‍यांच्‍या तावडीतून सोडवत रक्षण केल्याची खळबळजनक घटना पलढग कोथळी (ता. मोताळा) येथे 18 मे रोजी सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्‍याचे आई, वडील, बायको, मुलगा जखमी झाले आहेत.

पुंडलिक पंढरी तायडे (रा. पलढग कोथळी) यांनी या प्रकरणात बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्‍यांनी पत्‍नी सौ. लताबाई व मुलगा विठ्ठल यांच्‍यासह पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मोठा मुलगा  विठ्ठलचे  लग्न झाले असून, दुसरा मुलगा शिक्षण घेतो. पुंडलिक तायडे हे मलकापूरला एसटी डेपोत चालक आहेत. 18 मे रोजी संध्याकाळी घरी असताना विशिष्ट समाजाचा जमाव त्‍यांच्‍या घरासमोर आला. त्यांच्‍यासोबत गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदील जमदार व  लुकमान शहा होते. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आहेत का, अशी विचारणा त्‍यांनी केली. आमच्याकडे कोणीच आले नाहीत, असे त्‍यांना सांगितले असता वालसावंगी येथून तुमच्‍या समाजाच्‍या मुलाने आमच्‍या समाजातील मुलीला पळवून आणले आहे, असे ते म्‍हणाले.

यावेळी त्‍यांना आमच्‍याकडे कुणीच आले नाही असे वारंवार सांगूनही जमाव ऐकण्याच्‍या मनःस्‍थितीत नव्‍हता. पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांनी तिथून जमावाला काढून दिले. त्यानंतर रात्री 8.30 वाजता पुन्हा विशिष्ट समाजाचे 30 ते 40 लोक तायडे यांच्‍या घरासमोर जमले. त्‍यातील शेख खालीद शेख मसूद (रा. वालसावंगी ता. भोकरदन जि.जालना),  शे.सोहेल शेख बब्बू (रा. कोथळी), सै. लुकमान सै. लाल (रा.कोथळी), सै.अकतर सै. सत्तार (छोट्या), सुपडा अनु शाह  (रा. कोथळी), शे.सुपडा शे. बिलानी (रा.कोथळी), बाबा कुरेशी ऊर्फ  शेख वसीम शेख शेख सुपडू (रा. मोताळा) हातात  लाठ्याकाठ्या घेउन घरात घुसले.  विठ्ठल कुठे आहे, असे म्‍हणून त्‍यांनी लताबाईंना लाथा बुक्‍क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तुमचा मुलगा विठ्ठलने आमच्या समाजातील मुलगी पळवून नेण्यासाठी मदत केली आहे.

तुमच्या समाजाच्या मुलाने पळवून तिला तुमच्‍या घरी आणले आहे.  विठ्ठलने त्‍यांना मदत केली आहे, असे म्‍हणून त्‍यांनी विठ्ठलला पकडून घरातच बेदम मारहाण करायला सुरुवात केली.  खून करण्याच्या उद्देशाने सुपडा अनु शाह, शे.सोहेल शे. बब्बु यांनी त्‍याला घरातून ओढत ओढत बसस्‍टँडकडे नेले. तेथे मुलीकडील वालसावंगी येथून आलेले 3 ते 4 अनोळखी लोकांसह ते विठ्ठल मारहाण करत होते. विठ्ठलची पत्‍नी गुंडाबाई व नातू स्वप्निल यांनाही जमावाने मारहाण केली. त्‍याचवेळी गावातील इरफान नावाच्‍या तरुणाने विठ्ठलला जमावाच्‍या ताब्‍यातून सोडवत आपल्या घरात नेले. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्‍या मनःस्‍थितीत नव्‍हता. त्‍यांनी इरफानच्या घरात घुसून विठ्ठलला मारहाण केली. इरफान जमावाला समजावून सांगत होता व विठ्ठलला वाचवत होता. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तब्‍बल 30 ते 40 लोकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक आर. एम. जंजाळ करत आहेत.