ढगफुटीचा अंदाज हवामान विभागाला आलाच नाही… 3 तालुक्‍यांत अतिवृष्टी; पण 4 तालुके कोरडेच; कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यात काल, 28 जूनला अक्षरशः ढगफुटी झाली आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पण एवढा मोठा पाऊस होईल याचा अंदाज हवामान विभागाला कसा आला नाही, त्यांनी आधीच अलर्ट केले असते तर शेतकऱ्यांचे त्यांचे किमान काही नुकसान तरी टाळता आले असते, अशी चर्चा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यात काल, 28 जूनला अक्षरशः ढगफुटी झाली आणि होत्‍याचे नव्‍हते झाले. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या तोंडचे पाणी पळाले. पण एवढा मोठा पाऊस होईल याचा अंदाज हवामान विभागाला कसा आला नाही, त्‍यांनी आधीच अलर्ट केले असते तर शेतकऱ्यांचे त्‍यांचे किमान काही नुकसान तरी टाळता आले असते, अशी चर्चा आता होत आहे.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज असताना ढगफुटीच झाली. कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने प्रशासनासह सर्वांची तारांबळ उडाली. आमखेडचे धरण फुटल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडली गेली. अंबाशी धरणाची भिंत 75 टक्के खचली असून, कोणत्याही क्षणी धरण फुटण्याची शक्यता आहे. मेहकर, चिखली आणि सिंदखेड राजा तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज, 29 जूनला संध्याकाळपर्यंत नेमके किती शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याचा प्राथमिक अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.

3 तालुक्यांत पावसाचा धुमाकूळ
जिल्ह्यातील चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात पावसाने यावर्षी धुमाकूळ घातला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाला. गेल्या वर्षी चिखली तालुक्यात आतापर्यंत 132.2 मि.मी. पाऊस पडला होता. यंदा मात्र 234.5 मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मेहकर तालुक्यात गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 151.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद होती तर यावर्षी 259.9 इतका विक्रमी पाऊस पडला आहे. सिंदखेडराजा तालुक्यात गेल्यावर्षी आजपर्यंत 204.4 इतका पाऊस होता. यावर्षी 250.7 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. चिखली तालुक्यातील उंद्री, अमडापूर, एकलारा, मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव, लोणी आणि नायगाव या महसूल मंडळांत तर पावसाने कहरच केला असून, इथे तब्बल 300 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

4 तालुके कोरडे
जिल्ह्यात घाटावरच्या काही तालुक्यांत पावसाने कहर केला असताना घाटाखालील 4 तालुके मात्र पावसाअभावी कोरडेच आहे. शेगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद या तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शेगाव येथे आजच्या तारखेपर्यंत 109 मि.मी. इतका पाऊस पडला होता. यंदा मात्र फक्त 32.2 मि.मी. एवढा अत्यल्प पाऊस पडला आहे. मलकापूर तालुक्यात मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत 217.8 मि.मी. एवढा पाऊस होता. यावर्षी केवळ 69.4 मि.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आला. नांदुरा तालुक्यात गेल्यावर्षी 161.2 मि.मी. तर यावर्षी फक्त 74.8 मि.मी., जळगाव जामोद तालुक्यात गेल्यावर्षी 211.0 मि.मी. तर यावर्षी आतापर्यंत केवळ 43.6 मि.मी. इतका अत्यल्प पाऊस नोंदविण्यात आला.

शेगावात सर्वात कमी पाऊस
संतनगरी शेगाव तालुक्यात यावर्षी अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. शेगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 4.72 टक्के व 32.2 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. शेगाव तालुक्यातील शेगाव, माटरगाव, जलंब, जावळा आणि मनसगाव या पाचही महसूल मंडळांत अतिशय कमी पाऊस झाल्याने 90 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर घाटाखालील तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा उर्वरित पेरण्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील कोराडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात पाणी वाहत आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद अशी : (कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची) सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा : 48.1 मि.ली. (250.7 मि.ली.), चिखली : 43.2 (234.5 मि.ली.), मोताळा : 36.9 (113.4), बुलडाणा : 30 (130.3), मेहकर : 27.5 (259.9), देऊळगाव राजा: 26.3 (149), मलकापूर : 25.8 (69.4), लोणार : 24.2 (151), जळगाव जामोद : 19.4 (43.6), खामगाव : 13.3 (155.3), संग्रामपूर : 12.8 (115.3), नांदुरा : 12.1 (74) आणि सर्वात कमी शेगाव तालुक्यात : 6.6 (32.2) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 326.2 मि.ली. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 25.1 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगाव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जून 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 136.9 मि.ली. आहे. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोराडी मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे सांडवा वाहत आहे. रात्री 10.30 वाजेदरम्यान प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात 10 से.मी उंचीचा 8.76 क्युबीक मीटर प्रति सेकंद विसर्ग होत होता. त्यामुळे नदीकाठावरील मेहकर तालुक्यातील नागझरी, कल्याणा, नेमतापूर, फर्दापूर गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.