…तर जिल्ह्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन!

पालकमंत्र्यांचे निर्देश… कुणाची गय करू नका, कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा! बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. शासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातही कोरोनाविषयक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कुणालाही सोडू नये, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाच्या आढावा …
 

पालकमंत्र्यांचे निर्देश… कुणाची गय करू नका, कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. शासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्‍या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातही कोरोनाविषयक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कुणालाही सोडू नये, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाच्‍या आढावा बैठकीत केली. वारंवार सांगून देखील लोक ऐकत नाही. नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा लागेल, असे मत अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी देखील नागरिक अशाचप्रकारे नियमांचे पालन करत नसतील तर लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा यावेळी दिला.

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक आज, 31 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात  भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने तयारी ठेवावी, अशी सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, की प्रशासनाने बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधी पुरवठा आदींची सज्जता ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नये. ऑक्सीजनची पर्याप्त व्यवस्था करून ठेवावी. येणारे दोन महिने जिल्ह्यासाठी चिंतेचे असून, या परिस्थितीवर समन्वयाने मात केल्या जाईल. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. नियमानुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालमर्यादा ठेवावी.  तपासण्यांचा वेग कमी होऊ देऊ नका. याप्रसंगी जिल्ह्यातील टाळेबंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले.

सिंदखेड राजा येथे कोविड नियंत्रण बैठक

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड नियंत्रणासाठी विविध उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत. सध्या कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. नियमानुसार पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी  आज सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात आयोजित बैठकीत केली. बैठकीला तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार जयवंत सातव, आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोड, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी देव गुन्हावत आदी उपस्थित होते.  परिसरात रुग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, की ज्या गावांत रुग्ण आढळून येत आहे त्याठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या. तसेच रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात. गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवावे. तसेच गावागावात लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करावे. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.