तलाठी बनवतो म्‍हणून चांडोळच्‍या युवकाला 10 लाखांनी गंडवले!; गंडवणारे बांबल दोघे सख्खे भाऊ!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःमंत्रालयातील मोठ्या साहेबाशी ओळख आहे. एका झटक्यात काम होईल. तू 10 लाख दे. तुला तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची 10 लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आज, ६ मार्चला रमेश अंबादास बांबल (रा. सोळंके ले आउट, बुलडाणा) याला ताब्यात घेतले …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःमंत्रालयातील मोठ्या साहेबाशी ओळख आहे. एका झटक्यात काम होईल. तू 10 लाख दे. तुला तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची 10 लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आज, ६ मार्चला रमेश अंबादास बांबल (रा. सोळंके ले आउट, बुलडाणा) याला ताब्‍यात घेतले आहे. याचप्रकरणात 10 दिवसांपूर्वी त्‍याच्‍या सख्ख्या भावाला अटक करण्यात आली होती.

चांडोळ येथील संजय नामदेव देवकर या युवकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. संजय 2011 पासून बुलडाणा येथे कृषी खात्यात कंत्राटी तत्वावर नोकरीला होता. याच दरम्यान त्यांची ओळख गजानन अंबादास बांबल (रा. सोळंके ले आउट, बुलडाणा) याच्याशी ओळख झाली. गजाननचे पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ झेरॉक्स दुकान होते. 13 सप्टेंबर 2015 रोजी संजय देवकर यांनी बीड जिल्ह्यात तलाठी पदाची परीक्षा दिली होती. तलाठी पदाची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करून देतो व तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत 10 लाख रुपयांची मागणी गजाननने त्‍यांच्याकडे केली होती. सरकारी नोकरी लागेल म्हणून देवकर यांनी सुद्धा तडजोड करत 10 लाख रुपये गजाननला दिले होते. यातील साडेतीन लाख रुपये पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात पाच लाख रुपये खात्यात तर उर्वरित दीड लाख रुपये हे गजानन बांबल याचा भाऊ रमेश बांबल याच्याजवळ देण्यात आले. मात्र काही दिवसांनंतर परीक्षेच्या निकालात केवळ 80 गुण पडल्याने फसवणूक झाल्याचे देवकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर पैसे परत मागितले असता तुझे काम होऊन जाईन. थोडे थांब, असे त्‍याला सांगण्यात आले. मात्र 3 वर्षे उलटूनही ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले. त्यानंतर पुन्हा पैसे मागितले असता देत नाही काय करायचे ते करून घे, असे उत्तर या दोन भावांनी दिले. त्‍यामुळे संजयने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. मुख्य आरोपी गजानन बांबलला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर आज पोलिसांनी दुसरा आरोपी रमेशला अटक केली आहे. तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुधाकर गावरगुरु व ना.पो.काँ. गंगेश्वर पिंगळे करीत आहेत.

फसवणूक करणारे मोठे रॅकेट
युवकांच्या बेरोजगारीचा फायदा घेत नोकरीचे अमिष दाखवत फसवणूक करण्याच्‍या घटना वाढत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण तक्रारी दाखल करत नाहीत. स्पोर्ट सर्टिफिकेट काढून देण्यासाठी पैशाची मागणी तर काही जण थेट नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळतात. त्यामुळे फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.