तिसऱ्या लाटेसाठी सज्‍ज राहा; बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशात पुढील सहा ते सात महिन्यांत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे. तसेच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देशात पुढील सहा ते सात महिन्यांत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे. तसेच बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, 21 मे रोजी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांचीही उपस्थिती होती. ऑक्सिजन दिलेल्या कोविडबाधित रुग्णांना म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की म्युकर मायकोसिस आजाराबाबत सध्या बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करावे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रीत करावा. कुठेही औषधाविना रुग्णांचे हाल होऊ नये. म्युकर मायकोसिस आजाराबाबत रुग्णालयांना स्वच्छतेबाबत सूचित करावे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. म्युकर मायकोसिस उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्‍त्रक्रिया कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवरील उपचारांसाठी बाल रोग तज्ज्ञांची समिती तयार करावी. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. जिल्ह्यात बऱ्याच गावांनी लोकांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहे. या कक्षात गावातील संशयित रुग्णांना आणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे कक्ष जिल्हा परिषदेने गावागावात सुरू करण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध शासनाच्या आदेशानुसार कायम ठेवावे. निर्बंधामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आली आहे. पोलीस विभागाने निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याची कारवाई करावी. नागरिकांनी लसीकरण झालेले असले तरी कोरोना संसर्ग सुरक्षेची त्रिसूत्रीचे पालन करावे. घराबाहेर विनामास्क पडू नये. हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, गर्दीमध्ये जाणे टाळावे व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केले. त्यांनी मे महिन्यातील रुग्णवाढ, मृत्यू, झालेल्या एकूण तपासण्या, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड, कोविड केअर सेंटरवरील भोजन, पाणी, स्वच्छता, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची सद्यःस्थिती आदींचाही आढावा घेतला.