ती म्‍हणाली, ‘तू दोरी घेऊन फाशी घे व मरून जाय…’, त्याने तसेच केले! पत्नीविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील पळसाच्या झाडाला ३८ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ५ मे रोजी शेलोडी (ता. चिखली) येथे घडली होती. याप्रकरणी मृतक कडूबा भानुदास आठवे यांची आई मुक्ताबाई भानुदास आठवे यांनी काल, १७ ऑगस्ट रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत मुलाच्या मृत्यूला त्याची पत्नी, साला व सासरा कारणीभूत असल्याचे म्हटले …
 
ती म्‍हणाली, ‘तू दोरी घेऊन फाशी घे व मरून जाय…’, त्याने तसेच केले! पत्नीविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील पळसाच्या झाडाला ३८ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ५ मे रोजी शेलोडी (ता. चिखली) येथे घडली होती. याप्रकरणी मृतक कडूबा भानुदास आठवे यांची आई मुक्ताबाई भानुदास आठवे यांनी काल, १७ ऑगस्ट रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत मुलाच्या मृत्यूला त्याची पत्नी, साला व सासरा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा कडूबा हा अत्यंत गरीब व भित्र्या स्वभावाचा होता. त्याच्या या स्वभावाचा फायदा त्याची पत्नी, साला व सासरा घेत होते. साला व सासरा त्याला उसने पैसे दे म्हणून छळत होते. कडूबाची पत्नी त्यांना साथ देत होती. ४ मे रोजी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान कडूबा आणि त्याची पत्नी लक्ष्मीबाईचे पैशाच्या कारणावरून शेतात भांडण झाले. माझ्या भावाला व वडिलांना बोलावून तुम्हाला मारझोड करायला लावते, अशी धमकी लक्ष्मीबाईने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी साला व सासरा शेलोडी येथे आले. तिघांनी मिळून पुन्हा कडूबाशी भांडण केले व पैशाची मागणी केली, धमक्या दिल्या. तिघे जण कडूबा म्हणाले की “तू दोरी घेऊन फाशी घे व मरून जाय’. यानंतर तिघेही शेलोडी येथून निघून रास्तळ (ता. जालना) येथील त्यांच्या गावी गेले. या घटनेनंतर कडूबा शेतात गेला व शेतातील पळसाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या मुलाच्या मृत्यूस त्‍याची बायको लक्ष्मीबाई, साला व सासरा कारणीभूत असल्याचे तक्रारीत मुक्ताबाई यांनी म्हटले आहे. तक्रारीवरून लक्ष्मीबाई कडूबा आठवे (रा. शेलोडी, ता. चिखली), सासरे राजाराम मनाजी लेंडे व साला सचिन राजाराम लेंडे (रा. रास्तळ जि. जालना) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.