“तुझं बाळ मला देशील का?, ती म्‍हणाली, घेऊन जा, मला पैसे द्या…; तिचं वाक्‍य ऐकून हादरल्या पोलीस उपनिरिक्षक!; शेगावमधील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विपन्नावस्थेत नवजात बाळाला घेऊन बसलेली ती महिला येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. पण शेगावमध्ये असे दृश्य नवीन नसल्याने फारसे कुणी गांभीर्यानेही घेत नव्हते. त्याचवेळी संवेदनशील मनाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सुवर्णा गोसावी यांना कुणीतरी कळवले आणि त्यांनी तातडीने सहकाऱ्यांसह तिच्याकडे धाव घेतली.”कुठे राहतेस, तुझं बाळ …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विपन्नावस्‍थेत नवजात बाळाला घेऊन बसलेली ती महिला येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. पण शेगावमध्ये असे दृश्य नवीन नसल्याने फारसे कुणी गांभीर्यानेही घेत नव्‍हते. त्‍याचवेळी संवेदनशील मनाच्या म्‍हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक सुवर्णा गोसावी यांना कुणीतरी कळवले आणि त्‍यांनी तातडीने सहकाऱ्यांसह तिच्‍याकडे धाव घेतली.”कुठे राहतेस, तुझं बाळ मला देशील का?’ असे त्‍यांनी तिला विचारलं, तेव्‍हा तिने जे उत्तर दिलं, ते ऐकून श्रीमती गोसावी अक्षरशः हादरून गेल्या. ती महिला दीर्घ श्वास घेऊन म्‍हणाली, घेऊन जा पण मला पैसे द्या…

कहानी मोठी विदारक आणि हृदयाला पाझर फोडणारी आहे. सोबतच समाजात अजूनही माणुसकी जीवंत असल्याची प्रचितीही आणणारी आहे. झाले असे, की तालखेड (ता. मोताळा) येथील दाम्‍पत्‍य शेगावमध्ये मजुरी करण्यासाठी आले होते. त्‍यांनी रस्‍त्‍यावर पाल टाकला होता. यातील महिला पाच- सहा महिन्यांची गर्भवती असताना पती तिला सोडून निघून गेला. तेव्‍हापासून ती मागून खात होती, मिळेल ते काम करत होती. चार दिवसांपूर्वी कधीही बाळ होण्याची शक्‍यता असल्याने जवळच्‍या डॉ. शिंदे यांच्या दवाखान्याजवळ ती रेंगाळू लागली. ही बाब डॉ. शिंदे यांच्‍या लक्षात आली. त्‍यांच्‍या हृदयालाही तिची अवस्‍था बघून पाझर फुटला. त्‍यांनी तातडीने तिला दवाखान्यात नेत सुरक्षित प्रसुती करवली. दुसऱ्या दिवशी तिने दवाखान्यातून डिस्‍चार्ज मागितला.

डॉक्‍टरांनी तिच्‍यावर औषधोपचार करून डिस्‍चार्ज दिला. त्‍यानंतर ती दोन दिवसांपूर्वी रेणुकानगर भागात विपन्नावस्‍थेत नवजात बाळासह बसलेली होती. ही बाब काही दक्ष नागरिकांनी पोलीस उपनिरिक्षक सुवर्णा गोसावी यांना कळवली. श्रीमती गोसावी यांनी लगेच पोहेकाँ श्री. टेकाळे आणि अन्य सहकाऱ्यांसह तिच्‍याकडे धाव घेतली. सुरुवातीला संवाद साधायचा म्‍हणून तुझं बाळ मला देशील का, असं गंमतीने श्रीमती गोसावी म्‍हणाल्या, पण तिचे उत्तर ऐकून त्‍याही हादरून गेल्या होत्‍या. त्‍यांनी तिची मग सविस्तर चौकशी केली. एरवी कणखर, कठोर म्‍हणवले जाणारे पोलीसही तिची कर्मकहानी ऐकून भांबावून गेले. तिच्‍या चौकशीत तिचा भाऊ शेगावमध्ये असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने तिच्या भावाला शोधून आणून त्‍याच्‍याकडे तिला सुपूर्द केले. काहींनी आर्थिक मदतही केली. पोलीस, डॉक्‍टरांच्‍या या माणुसकीची चर्चा सध्या शेगावमध्ये होत आहे.