तुम्‍हाला आलाय का “कौन बनेगा करोडपती’चा मेसेज? मोताळा तालुक्‍यातील अनेकांवर फेकले जाळे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. कमी व्याजदराने कर्ज देण्यापासून तर तुमच्या लकी क्रमांकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे मेसेज स्मार्टफोन धारकांना सातत्याने येत आहेत. रक्कम मिळवण्यासाठी काही जीएसटी रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर मात्र कोणताही संपर्क होत नाही व रक्कम भरणाऱ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. …
 
तुम्‍हाला आलाय का “कौन बनेगा करोडपती’चा मेसेज? मोताळा तालुक्‍यातील अनेकांवर फेकले जाळे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. कमी व्याजदराने कर्ज देण्यापासून तर तुमच्या लकी क्रमांकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे मेसेज स्मार्टफोन धारकांना सातत्याने येत आहेत. रक्कम मिळवण्यासाठी काही जीएसटी रक्कम भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर मात्र कोणताही संपर्क होत नाही व रक्कम भरणाऱ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने अशा घटना वाढत आहेत. सायबर पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही काही जण अशा फसवणुकीला बळी पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या ३९ घटना समोर आल्या आहेत.

कौन बनेगा करोडपती, एअरटेल, जिओ, वोडाफोन यांनी केलेल्या लकी ड्रॉमध्ये तुमच्या मोबाइल क्रमांकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचा व्हाॅट्स ॲप मेसेज सध्या मोबाइल धारकांना येतोय. मोताळा तालुक्‍यातील अनेकांवर आमिषाचे जाळे फेकण्यात आले. श्रीपाद कुलकर्णी यांनाही असा मेसेज आला होता. त्‍यांनी तातडीने बुलडाणा लाइव्हला कळवले. मेसेज पाठवणाऱ्या भामट्यांनी समोरचा व्यक्‍ती गळाला लागावा म्‍हणून काही व्हिडिओसुद्धा पाठवले आहेत. त्यामध्ये टेबलवर ठेवलेली भलीमोठी रक्कम तुमचीच आहे. फक्त १२२०० रुपये जीएसटी रक्कम एसबीआयच्या एका खात्यावर टाका. तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत २५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले जाते. तातडीने तुम्ही रक्कम भरली नाही तर तुमची लॉटरी रद्द होईल, अशी भीतीही दाखवली जाते. त्यामुळे काही जण ती रक्कम भरतातसुद्धा. मात्र त्यानंतर समोरील नंबरवर संपर्क होत नाही. आपल्याला बनवल्याचे लक्षात आल्याने अनेक जण अशा प्रकरणात तक्रारीच देत नाहीत. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनोळखी मोबाइल नंबरवरून आलेल्या लिंक व फसव्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन बुलडाणा सायबर पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ…
२०१६ मध्ये जिल्ह्यात १६सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती.२०१७ मध्ये २० गुन्हे, २०१८ मध्ये २२ गुन्हे, २०१९ मध्ये ३९ गुन्हे, २०२० मध्ये ६२ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे ३९ गुन्हे, महिलांसंबंधी ९ गुन्हे, सोशल मीडियावर बदनामी केल्याचे ७ गुन्हे तर सेक्सटॉर्शनचे २ गुन्हे दाखल झाले आहेत.

अधिकारी म्‍हणतात…
कमी व्याजदरात कर्ज देण्याचे, लॉटरीचे आमिष दाखवून तुम्हाला बँक खात्याची माहिती मागितल्यास देऊ नका. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्डची माहिती अनोळखी लोकांना देऊ नका. सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. विनाकारण तुम्हाला कुणी फुकटात पैसे देत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीच्या मेसेजकडे दुर्लक्ष करा. – सुभाष दुधाळ, सहायक पोलीस निरिक्षक, सायबर क्राईम पोलीस स्टेशन, बुलडाणा