त्‍याला दिली ओसरी, ताे पाय पसरी!; स्टेट बँक, न्यायमंदिरात लागण

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्ध राज्यभर लढणारे अन्न औषधी प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहर व जिल्हा हादरला असतानाच बुलडाणा शहरात कोरोना नव्याने हात पाय पसरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. विविध शासकीय आस्थापनांबरोबरच वैयक्तिक पातळीवर कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.शहरातील कोरोना बधितांचा …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्ध राज्यभर लढणारे अन्‍न औषधी प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहर व जिल्हा हादरला असतानाच बुलडाणा शहरात कोरोना नव्याने हात पाय पसरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. विविध शासकीय आस्थापनांबरोबरच वैयक्तिक पातळीवर कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शहरातील कोरोना बधितांचा आकडा जेमतेम 17 दिवसांत सव्वादोनशेच्या पल्याड गेलाय! यावरून शहरावरील कोरोनाचे सावट किंवा धोका किती गडद आहे याची कल्पना येते. जिल्हा न्यायालयाने सर्व दक्षता घेऊनही न्यायालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे एक दिवस हे न्यायालय बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना याला दुजोरा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या संचारबंदी आदेश व कार्यपद्धती (एसओपी) संदर्भात बैठक देखील पार पडल्याची माहितीही ॲड. सावळे यांनी दिली. यादरम्यान स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आले. प्राप्त माहितीनुसार 3 कर्मचारी बाधित झाल्याची चर्चा आहे. यामुळे शाखेचे कामकाज 16 फेब्रुवारीला विस्कळीत झाले. यामुळे पालिकेने संपूर्ण बँक परिसर सॅनिटाईझ केला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती , पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी तिथे भेट दिली.

मुख्यालयी धक्कादायक वाढ

दुसरीकडे चालू महिन्यात बुलडाणा शहरात कोरोनाचा आकडा धोकादायकरित्या वाढला आहे. 1 ते 17 फेब्रुवारी दरम्यानच हा आकडा 233 पर्यंत गेलाय. 16 फेब्रुवारीला तब्बल 37 रुग्ण आढळलेत. आज 17 फेब्रुवारीला ही संख्या 22 इतकी आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 10, तीन तारखेला 13, 5 अणि 6 तारखेला प्रत्येकी 11, 7 तारखेला 9, 8 तारखेला 13, 9 तारखेला 6, 10 तारखेला 8, 12 तारखेला 12 अशी रुग्ण संख्या होती. यानंतर हे आकडे वेगाने वाढले. 12 तारखेला 17, 13 तारखेला 23, 14 व 15 तारखेला प्रत्येकी 24 अशी रुग्णसंख्या होती. यामुळे बुलडाणा शहरावर कोरोनारुपी संकटाचे काळे ढग पुन्हा जमून येत आहेत. हे संकट अपवाद वगळता आपणच ओढवून घेतले. काही महिन्यांपूर्वी यापेक्षा गंभीर धोक्याचा बुलडाणेकरांनी संयम व धैर्याने सामना करून सामना केला होता. आताही हेच करावे लागणार आहे.