दहाच महिन्यांत संसाराचा खेळखंडोबा! सासरच्यांविरोधात विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव; १० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, मेहकर तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जून २०२० मध्ये लग्न झालेल्या विवाहितेचा सासरच्यांनी पैशासाठी छळ केला. अवघ्या १० महिन्यांत तिला घराबाहेर हाकलले. घटस्फोट मागितला. त्यामुळे छळाला कंटाळून विवाहितेने काल, १७ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. राणी अनिकेत लाड (२०) सध्या माहेरी जनुना (ता. खामगाव) …
 
दहाच महिन्यांत संसाराचा खेळखंडोबा! सासरच्यांविरोधात विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव; १० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, मेहकर तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जून २०२० मध्ये लग्न झालेल्या विवाहितेचा सासरच्यांनी पैशासाठी छळ केला. अवघ्या १० महिन्यांत तिला घराबाहेर हाकलले. घटस्फोट मागितला. त्यामुळे छळाला कंटाळून विवाहितेने काल, १७ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. राणी अनिकेत लाड (२०) सध्या माहेरी जनुना (ता. खामगाव) येथे आली आहे. तिने तक्रारीत म्‍हटले आहे, की गेल्यावर्षी देऊळगाव साकर्शा येथील अनिकेत दत्तू लाड (२६) याच्याशी तिचा विवाह झाला होता. अनिकेत मुंबईला एका बँकेत नोकरीला आहे. लग्नानंतर २-३ महिने राणीला सासरच्यांनी चांगले वागविले. अनिकेत अधून मधून घरी देऊळगाव साकर्शा येथे यायचा. तेव्हा तिचा सासरा, सासू, नणंद त्याला राणीविरुद्ध भडकवून द्यायचे. त्यांच्या चिथावणीवरून अनिकेत राणीला मारहाण करायचा, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तुझ्या वडिलांनी हुंडा खूप कमी दिला. मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी ५ लाख रुपये आण, अशी मागणी अनिकेत करत होता. परिस्थिती हलाखीची असताना राणीच्या वडिलांनी तडजोड करून १ लाख रुपये दिले. राणीचे वडील जेव्हा देऊळगाव साकर्शा येथे जायचे तेव्हा आमचा मुलगा बँकेत आहे. आम्हाला इतर ठिकाणाहून जास्त हुंडा मिळत असताना तुमची मुलगी केली, असे टोमणे राणीच्या सासरकडील मंडळी मारत होती.

राणीच्या नणंद आणि नंदोई जेव्हा जेव्हा देऊळगाव साकर्शा येथे येत होते तेव्हा “हिला कामधंदा येत नाही. अजून काही बिघडले नाही, अनिकेतचे दुसरे लग्न करा व हिला फारकती द्या असे म्हणत होते. फ्लॅट घेण्यासाठी उर्वरित ४ लाख रुपये घेऊन ये नाहीतर इथे रहायचे नाही. आम्ही तुझ्या जीवाचे बरेवाईट करून टाकू अशी धमकी देऊन राणीला १ एप्रिल २०२१ रोजी घराबाहेर हाकलले, असेही तिने तक्रारीत म्‍हटले आहे. तेव्हापासून ती माहेरी राहत आहे. २३ मे रोजी सासरचे लोक खामगावला आले. एका नातेवाइकाकडे राणीला बोलावले तिथे तिला काही कागदांवर सही करायला सांगितले. सही कशासाठी असे तिने विचारले असता आम्हाला फारकती पाहिजे. आम्ही दुसरी मुलगी शोधली आहे असे उत्तर सासरच्यांनी दिले. राणीने सह्या करायला नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

महिला तक्रार निवारण कक्षात समझोता न झाल्याने राणीने काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी राणीचा पती अनिकेत दत्तू लाड, सासरा दत्तू लाड (५८), सासू देवकाबाई दत्तू लाड (५५), नणंद आरती दत्तू लाड (१८, चौघे रा. देऊळगाव साकर्शा, ता. मेहकर, जि. बुलडाणा), नणंद पूजा सुनिल सुळोकार (३०), सुनिल सुळोकार (३६, दोघेही रा. उमरा, ता. मेहकर, जि. बुलडाणा), चुलत सासू प्रिती रामेश्वर लाड (३०), चुलत सासरा रामेश्वर लाड (३५), विठ्ठल लाड (३२, तिघेही रा. देऊळगाव साकर्शा, ता. मेहकर, जि. बुलडाणा) व चुलत नणंद मुक्ता हरीदास पुंड (३०, रा. जनुना, ता. खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.