दीड लाखाचा घपला!; .निमगाव गुरूच्‍या माजी सरपंच राधा चित्ते, ग्रामसेवक मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अधिकाराचा दुरुपयोग करत 14 व्या वित्त आयोगाच्या 1 लाख 57 हजार 865 रुपयांच्या निधीचा अपहार करणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु येथील माजी सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालिन सरपंच राधा अनिल चित्ते आणि ग्रामसेवक एस. पी. मोरे यांनी निधीत अपहार केल्याची तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अधिकाराचा दुरुपयोग करत 14 व्या वित्त आयोगाच्या 1 लाख 57 हजार 865 रुपयांच्‍या निधीचा अपहार करणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु येथील माजी सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालिन सरपंच राधा अनिल चित्ते आणि ग्रामसेवक एस. पी. मोरे यांनी निधीत अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली होती. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत शौचालय बांधकाम, नाली दुरुस्ती, समाजमंदिर दुरुस्ती, अंगणवाडी कपाट, एलईडी लाईट, अंगणवाडी खेळणी खरेदी, ई लर्निंग, संगणक दुरुस्ती करणे या कामात 1 लाख 50 हजार 865 रुपयांची अनियमितता झाल्याचे समोर आले. त्यावरून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊळगाव राजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष गडाख यांच्यामार्फत देऊळगाव राजा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही हे प्रकरण चौकशीवर ठेवले होते. अखेर तक्रार दिल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी काल याप्रकरणी तत्कालीन सरपंच राधा अनिल चित्ते व ग्रामपंचायत सचिव एस. पी. मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.