दीड लाखासाठी चालू होता 14 वर्षीय बालिकेच्‍या आयुष्याशी खेळ!; गतिमंद मुलाशी लागणार होते लग्‍न अन्‌ मध्यस्‍थी होती मावशी!! आई-वडिलांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड लाख रुपयांसाठी 14 वर्षीय बालिकेच्या आयुष्याशी खेळ दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर आई-वडिलांनीच करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या बालिकेचा विवाह 25 वर्षीय गतिमंद तरुणासोबत लावून देण्याचा प्रयत्न 26 एप्रिलला चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने हाणून पाडला होता. या प्रकरणी सागवनचे ग्रामविकास अधिकारी अरविंद टेकाळे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दीड लाख रुपयांसाठी 14 वर्षीय बालिकेच्‍या आयुष्याशी खेळ दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्‍हे तर आई-वडिलांनीच करण्याचा प्रयत्‍न केल्याचे तपासात समोर आले आहे. या बालिकेचा विवाह 25 वर्षीय गतिमंद तरुणासोबत लावून देण्याचा प्रयत्‍न 26 एप्रिलला चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने हाणून पाडला होता. या प्रकरणी सागवनचे ग्रामविकास अधिकारी अरविंद टेकाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍यावरून आज, 28 एप्रिलला बालिकेच्या आई- वडिलांसह वर, वराची आई आणि वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरतड (ता. भोकरदन, जि. जालना) येथील 14 वर्षीय बालिकेचा विवाह सागवन (ता. बुलडाणा) येथील भानुदास तेजराव शिंदे यांचा मुलगा विकी भानुदास शिंदे यांच्याशी 26 एप्रिलला पार पडणार होता. लग्नात मध्यस्थी म्हणून बालिकेची सागवन येथेच राहणारी मावशी संगीता प्रभाकर हागे होती. लग्नासाठी वर पक्षाकडून बालिकेच्या आई-वडिलांना दीड लाख रुपये मिळणार होते. 1 महिन्यापूर्वीच 50 हजार रोख रक्कम तिच्‍या आई-वडिलांनी घेतले होते. मात्र बालविवाहाचा हा गंभीर प्रकार चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळताच पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उधळण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होते. याप्रकरणी सागवनचे ग्रामसेवक अरविंद टेकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे वडील अनिल तेजराव सोनुने (41), आई रेखा अनिल सोनुने (35, दोघेही रा. मुरतड, ता. भोकरदन, जि. जालना), नवरदेव विकी भानुदास शिंदे (25), त्‍याचे वडील भानुदास तेजराव शिंदे (45) आणि मध्यस्थी करणारी बालिकेची मावशी संगीता प्रभाकर हागे (35) तिघेही रा. सागवन, ता. बुलडाणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.