दुसऱ्या लग्‍नासाठी ती ‘भरोसा’ ठेवून आली… तिच्‍यासोबत त्‍यांनी जे केले ते ऐकून व्‍हाल थक्‍क!; चिखली तालुक्‍यातील धक्‍कादायक प्रकार

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 35 वर्षीय घटस्फोटित महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून भरोसा (ता. चिखली) येथे बोलावले. नंतर तिला लुटून रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारकर्ती महिला नाशिकची असून, फसवणारे भरोसा येथील आहेत. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 35 वर्षीय घटस्फोटित महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून भरोसा (ता. चिखली) येथे बोलावले. नंतर तिला लुटून रस्‍त्‍यावर सोडून दिल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारकर्ती महिला नाशिकची असून, फसवणारे भरोसा येथील आहेत. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती महिला सुनीता अनिल गायकवाड (35, रा. गांधीनगर, नाशिक) या महिलेचा 2 वर्षांपूर्वी घटस्‍फोट झालेला आहे. तिला 16 वर्षांचा मुलगा आहे. सुनीता यांची भरोसा येथील संगीता जाधव या महिलेशी चार- पाच महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. दरम्यानच्‍या काळात तुझे दुसरे लग्न लावून देते, असे म्हणत संगीताते सुनीताला भरोसा येथे बोलावले होते. 26 मार्च रोजी सुनीता भरोसा येथे आली. काही दिवस भरोसा येथे राहिल्यानंतर 30 मार्च रोजी संगीताने तिला जालना येथे एका लग्नासाठी नेले. जालन्‍याहून तिला जाफराबाद येथे नेले. 30 मार्चला जाफराबाद येथेच संगीताच्या बहिणीच्या घरी मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी 31 मार्च रोजी भरोसा येथे परतताना आणखी दोन जण सोबत होते. चौघे मोटारसायकलने परत येत असताना मध्येच टेंभूर्णी (ता. जाफराबाद) रोडवर सुनीताला मोटारसायकलवरून उतरून दिले. तिच्याजवळची पर्स हिसकावून विवो कंपनीचा मोबाईल व नगदी 5000 रुपये काढून घेतले व तिला रस्त्यावर सोडून निघून गेले. सुनीता बुलडाणा जिल्ह्यात नवीन असल्याने ती भरोसाऐवजी भोरसा भोरसी (ता. चिखली) येथे कशीबशी पोहोचली. भोरसा भोरसी येथील पोलीस पाटलांना हकीकत सांगितल्यानंतर त्‍यांनी तिला अमडापूर पोलीस ठाण्यात आणले. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी  संगीता भारत जाधव, दीपक जालिंधर जाधव (दोघेही रा. भरोसा) व एका अनोळखी व्‍यक्‍तीविरुद्ध काल गुन्हा दाखल केला. अधिक तपास सुरू आहे.