दोन कुटुंबाच्‍या भेटीतील 15 वर्षीय मुलीचे फोटो एडिट करून बनवले आक्षेपार्ह; गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या तरुणाने आधीच केली होती शरीरसुखाची मागणी!; बुलडाण्यात पोक्‍सो कायद्यानुसार गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षण आणि लग्नासाठीचे वय पूर्ण झाल्यानंतर माझ्या मुलीचे लग्न तुझ्या मुलासोबत लावून देऊ, असा शब्द त्यांनी चुलत बहिणीला दिला अन् इथेच फसले… त्यानंतर लगेचच बहिणीने लग्नाची घाई सुरू केली. मुलीचे शिक्षण होऊ द्या, असे वारंवार सांगूनही ते ऐकायला तयार नव्हते… आधी तगादा, नंतर धमक्या सुरू झाल्या. एवढ्यावरच न थांबता थेट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिक्षण आणि लग्‍नासाठीचे वय पूर्ण झाल्यानंतर माझ्या मुलीचे लग्‍न तुझ्या मुलासोबत लावून देऊ, असा शब्‍द त्‍यांनी चुलत बहिणीला दिला अन्‌ इथेच फसले… त्‍यानंतर लगेचच बहिणीने लग्‍नाची घाई सुरू केली. मुलीचे शिक्षण होऊ द्या, असे वारंवार सांगूनही ते ऐकायला तयार नव्‍हते… आधी तगादा, नंतर धमक्‍या सुरू झाल्या. एवढ्यावरच न थांबता थेट मुलीचे फोटो एडिट करून ते अश्लीलरित्‍या तयार करून व्‍हायरल करणे सुरू केले. त्‍यामुळे धक्‍का बसलेल्या पित्‍याने थेट मुलीला घेऊन बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठले. बहीण, तिचा पती आणि तिच्‍या मुलाविरुद्ध तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी या तिघांविरुद्ध पोक्‍सो कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्‍हे दाखल केले आहेत.

जोहरनगर येथील 15 वर्षीय मुलीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती 11 वीत शिकते. तिच्‍या वडिलांनी त्‍यांच्‍या चुलत बहिणीला आपल्या मुलीचे लग्‍न तिच्‍या मुलासोबत लावून देणार असल्याचे सांगितले होते. तो मुलगा अकोला येथील सर्वोपचार रुग्‍णालयात सफाई कामगार आहे. भुसावळ येथे आजोबाकडे पीडित मुलगी पाच- सहा महिन्यांपूर्वी गेली होती. तेव्‍हा तिला तिच्‍या वडिलांची चुलत बहीण फरिदा शेख उस्मान हिने पाहिले होते. त्‍याचवेळी दोन्‍ही कुटुंबात फरिदा हिचा मुलगा फिरोजसोबत पीडित तरुणीचे लग्‍न लावून देण्याचे ठरले होते. मात्र यासाठी मुलीचे शिक्षण आणि वय पूर्ण होऊ देण्याचेही सांगण्यात आले होते. याचवेळी दोन्‍ही कुटुंबांनी सोबत फोटोही काढले. मात्र त्‍यानंतर फरिदा हिने लग्‍नासाठी तगादाच लावणे सुरू केले.

सतत ती फोन करून लग्‍न कधी करणार याबद्दल विचारू लागली. हद्द ही झाली की 26 जूनला पीडितेच्‍या काकूला फरिदाने कॉल केला की त्‍याला समजावून सांग की त्‍याच्‍या मुलीचा विवाह माझ्या मुलासोबत लाव अन्यथा त्‍याच्‍या मुलीचे सर्व फोटो सोशल मीडिया व्‍हायरल करेन. एवढ्यावरच न थांबता त्‍यांच्‍या मोबाइल मुलीचे 5 फोटोही पाठविण्यात आले. हे फोटो एडिट केलेले होते, त्‍यात एक मुलगी अस्पष्ट दिसत होती. त्‍याखाली सामाजिक कार्यकर्ते xxxxx यांची मुलगी मनमानमध्ये एका मुलासोबत रंगरसिया हॉटेलमध्ये असा उल्लेख केलेला होता. याशिवाय पीडितेच्‍या मैत्रिणीच्‍या इन्स्‍टाग्राम खात्‍यावरही तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. फिरोजने पीडितेला शरीरसुखाची मागणीही केली होती, असे पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून शहर पोलिसांनी फरिदा शेख उस्मान, शेख उस्मान शेख शब्बीर आणि त्‍यांचा मुलगा फिरोज या तिघांविरुद्ध विनयभंगासह पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.