दोन महिन्यांपासून गुंगारा देणारे बापलेक अखेर जाळ्यात; खामगाव शहर पोलिसांची कामगिरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र हाणामारीच्या गुन्ह्यातील बापलेकाला अमरावतीतून अटक करून आणण्यात आले. ही कारवाई आज, 12 जूनच्या पहाटे करण्यात आली. ते दोन महिन्यांपासून फरारी होते. मार्चमध्ये आठवडे बाजारात भंगार दुकानाचे मालक राजेंद्र इंगळे व त्यांच्या शेजारील अंड्यांच्या दुकानाचे मालक मोहन अहीर यांच्यात वाद झाला होता. यात मोहन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्‍त्र हाणामारीच्‍या गुन्ह्यातील बापलेकाला अमरावतीतून अटक करून आणण्यात आले. ही कारवाई आज, 12 जूनच्‍या पहाटे करण्यात आली. ते दोन महिन्यांपासून फरारी होते.

मार्चमध्ये आठवडे बाजारात भंगार दुकानाचे मालक राजेंद्र इंगळे व त्यांच्या शेजारील अंड्यांच्‍या दुकानाचे मालक मोहन अहीर यांच्यात वाद झाला होता. यात मोहन अहीर व त्याच्या साथीदारांनी राजेंद्र इंगळे यांना लोखंडी रॉड, हातोड्याने मारहाण केली. यात इंगळे गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीच यातील काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी फरारी होते.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे यांच्‍याकडे आहे. त्‍यांना गुन्ह्यातील आरोपी अमरावतीत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार त्‍यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांचे एक पथक कालच अमरावती येथे दाखल झाले होते. आज पहाटे अमरावती येथून मुख्य आरोपी मोहन अहीर (52) व त्याचा मुलगा आदित्य अहीर (24 रा. सतीफैल खामगाव) यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. दोन्ही आरोपींना खामगावच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे, पो.काँ. युवराज शेळके, अमरदीप ठाकूर, प्रफुल्ल टेकाडे यांनी केली.