दोन मुलांच्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी सुरू, दोषींवर कारवाई होणारच : मंत्री यशोमती ठाकूर; बंद खोलीत बालकांशी चर्चा

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड महिन्यापूर्वी बुलडाणा शहरातील बालगृहात दोन मुलांनी केलेल्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईलच, असा विश्वास देत या विषयावर अधिक काही बोलण्यास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नकार दिला. आज, 23 जानेवारीला बुलडाण्यातील बाल निरीक्षण गृहाला श्रीमती ठाकूर यांनी …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड महिन्यापूर्वी बुलडाणा शहरातील बालगृहात दोन मुलांनी केलेल्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईलच, असा विश्‍वास देत या विषयावर अधिक काही बोलण्यास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नकार दिला.


आज, 23 जानेवारीला बुलडाण्यातील बाल निरीक्षण गृहाला श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली. दीड महिन्यापूर्वी याच बालगृहात दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांनी आत्महत्या केली होती. साडेबाराच्या सुमारास मंत्री यशोमती ठाकूर यांचा ताफा बालगृहात पोहोचला. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळदेखील होते. निरीक्षणगृहात पोहोचल्यानंतर 4 बालकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी बालकांच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला. त्यानंतर निरीक्षणगृहात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री यशोमतीताईंनी बालकांनी आत्महत्या केलेल्या जागेचीही पाहणी केली.
चारही मुलांसोबत 15 मिनिटे चर्चा
ताईंनी बालगृहातील 4 बालकांसोबत सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि निरीक्षण गृहातील कर्मचार्‍यांनाही खोलीच्या बाहेर थांबण्यास सांगितले. ताईंनी बालकांसोबत नेमकी काय चर्चा केली हे कळू शकले नाही.
फोटोेंना चढवलेले हार पुन्हा काढले
मंत्री यशोमती ठाकूर बालगृहाला भेट द्यायला येणार असल्याने प्रशासनाने तयारी करून ठेवली होती. शहर पोलिसांचा ताफाही बालगृहात दाखल झाला होता. तेवढ्यात सव्वाबाराच्या सुमारास ताईंचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून हार चढवले. पाचच मिनिटांनंतर पुन्हा मंत्री येणार असल्याचा निरोप आला आणि चढवलेले हार पुन्हा काढण्यात आले.