धक्कादायक! धावत येऊन सांगितले होते महिला विहिरीत पडली; माहिती देणाराच निघाला आरोपी!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नातेवाइकांना महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.बुलडाणा शहरातील मोठी देवी परिसरात राहणार्या बेबीताई बावणे (55) या 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शौचास गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही परतल्या नव्हत्या. दरम्यान, सुरेश साहेबराव पवार (47, रा. …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नातेवाइकांना महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बुलडाणा शहरातील मोठी देवी परिसरात राहणार्‍या बेबीताई बावणे (55) या 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शौचास गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही परतल्या नव्हत्या. दरम्यान, सुरेश साहेबराव पवार (47, रा. सावित्रीबाई फुलेनगर) बुलडाणा याने येऊन बेबीताई विहिरीत पडल्याची माहिती दिली होती. नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेऊन बेबीताईंना जखमी अवस्थेत विहिरीतून बाहेर काढले व बुलडाण्याच्या सरकारी रुग्णालयात आणले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी उपचारादरम्यान बेबीताईंचा मृत्यू झाला होता. बेबीताईंचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. बेबीताईंच्या गळ्यातील सोन्याची पोत गायब असल्याने दागिन्यांसाठी लुटमार करून खून केल्याची तक्रार बेबीताईंच्या मुलाने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या तपासात या घटनेची माहिती नातेवाईकांना देणारा सुरेश पवार हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक करून काल न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.